NCP Sharad Pawar ( Marathi News ) : बारामती विधानसभा मतदारसंघातून आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बारामतीत यंदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा काका-पुतण्यातील सामना पाहायला मिळणार आहे. युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी आपल्या नातवाला बारामती जिंकण्यासाठीचा कानमंत्र दिला आहे.
"युगेंद्र पवार यांना राजकारणात यशस्वी होण्यासाठी काय सल्ला द्याल?" असा प्रश्न पत्रकारांकडून शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार म्हणाले की, "मला आज सहज आठवलं की, मी ५७ वर्षांपूर्वी बारामतीच्या तहसील कार्यालयात स्वत:चा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो होतो. त्या दिवसापासून आजपर्यंत सातत्याने जनतेनं मला निवडून दिलं आहे. जनतेशी असलेल्या बांधिलकीमुळे मला लोकांनी सतत ५७ वर्ष लोकप्रतिनिधी होण्याची संधी दिली. नव्या पिढीतील आमच्या सर्वच उमेदवारांना माझा सल्ला आहे की, लोकांशी बांधिलकी ठेवा, विनम्रता ठेवा. लोकांनी संधी दिल्यानंतर ती विनम्रतेने स्वीकारून लोकांसाठी जागृक राहा."
युगेंद्र पवार यांच्या विजयाचा विश्वास
शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच युगेंद्र पवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. "बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे, तेवढी क्वचितच कोणाला असू शकेल. माझा बारामतीकरांवर पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मला शक्ती देण्याचे काम बारामतीकरांनी केलं आहे आणि याची सुरुवात १९६५ पासून ते आतापर्यंत आहे. इतक्या निवडणुकींना उभा राहिलो. सुरुवातीच्या काळात मला इथे थांबावे लागायचे. नंतरच्या कालावधीत माझी जबाबदारी बारामतीकरांनी घेतली. त्यामुळे या बारामतीकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांना मोठ्या मतांनी विजयी करतील," असं पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले युगेंद्र पवार हे आजोबा शरद पवारांचा विश्वास सार्थ ठरवत विजय मिळवतात की अनुभवी अजित पवार हेच बारामतीतून बाजी मारतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.