NCP Sharad Pawar ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असल्याने बंडोबांना थंड करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रमुखांची धावपळ सुरू असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातही काही ठिकाणी बंड झाल्याने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरले असून आज पवार हे इंदापूर दौऱ्यावर जाणार आहेत. इंदापुरात शरद पवारांनी भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याने प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे आणि भरत शाह यांसारखे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आणि त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. यातील प्रवीण माने यांनी तर अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. या बंडखोरीचा हर्षवर्धन पाटील यांना मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने आज शरद पवार यांच्याकडून नाराज नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जाणार असल्याचे समजते.
शरद पवार हे आज इंदापूर दौऱ्यावेळी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्यासह आप्पासाहेब जगदाळे आणि भरत शाह यांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पवार यांच्या प्रयत्नांना यश येऊन इंदापुरातील बंड थंड होणार की प्रवीण माने हे आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
प्रवीण माने यांची उमेदवारी वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी
हर्षवर्धन पाटील यांनी हातात तुतारी घेतल्याने अस्तित्वात आलेल्या तिसऱ्या आघाडीतून प्रवीण माने की आप्पासाहेब जगदाळे हे उमेदवार असणार, असे निश्चित नव्हते. मात्र,'माझे ग्रामदैवत बाबीरबुवाच्या चरणी नतमस्तक होऊन तेथील गुलाल पुडीत बांधून सभेला आलो आहे. त्या गुलालाची शपथ घेऊन सांगतो की, काहीही केले तरी मी उमेदवारी मागे घेणार नाही. हाताला फक्त कपाळाला गुलाल लावतो. तो उधळण्यावर फक्त तुमचा अधिकार आहे,' अशा शब्दात आपला इरादा स्पष्ट करत माजी जिल्हा परिषद सदस्य, सोनाई उद्योग समुहाचे संचालक प्रवीण माने यांनी काही दिवसांपूर्वी अपक्ष म्हणून इंदापूर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
आप्पासाहेब जगदाळेंची भूमिका निर्णायक
१९९५ मध्ये इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्यानंतर तत्कालीन अपक्ष उमेदवार निवडून आला होता. तिरंगी लढत झाली तर अपक्ष उमेदवार निवडून येतो हा इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे. मात्र, तिसऱ्या आघाडीतील महत्त्वाचे नेते आप्पासाहेब जगदाळे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. जगदाळे यांचा आमदार दत्तात्रय भरणे यांच्याशी विशेष स्नेह आहे. हर्षवर्धन पाटील हे जरी मामा असले तरी त्यांच्याशी सख्ख नाही. काही दिवसांपासून प्रवीण माने किंवा अप्पासाहेब जगदाळे हे दोघेही तिघांच्या समन्वयातून उमदेवार निश्चित करण्यात येईल, असे सांगत होते. मात्र, प्रवीण माने यांनी उमदेवारी अर्ज दाखल केल्याने जगदाळे नाराज असल्याचे बोलले जाते. त्यामुळे ते कोणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.