Indapur Vidhan Sabha ( Marathi News ) : इंदापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. यामुळे मतविभाजन होणार हे निश्चित आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे गेल्या १० वर्षांपासून मतदारसंघावर लक्ष नसल्याची चर्चा होऊ लागल्याने मतदारसंघावरील पकड कमी झाल्याचं बोललं जात आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या कर्मयोगी व निरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून गेली अनेक वर्षे सातत्याने शेतकरी सभासदांना उसाला कमी दिलेला दर व कामगारांचे नियमित नसलेले पगार हेदेखील मुद्दे पाटील यांना अडचणीचे ठरणार आहेत.
लोकसभा व विधानसभेला गणिते वेगळी राहत असल्याने पाटील यांची नेहमीच कोंडी झाली आहे. त्यामुळे अनेकदा पक्षबदल करावा लागला. राज्यपातळीवरील नेता अशी प्रतिमा असताना सातत्याने पक्षबदल झाल्याने विश्वासार्हता कमी झाली आहे. गेली अनेक दशकांपासून असलेले वैर विसरून शरद पवार गटात प्रवेश केला. लोकसभेला खासदार सुळे यांना तालुक्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी मदत केली. त्यांचा पाटील यांच्या प्रवेशाला मोठा विरोध होता, मात्र प्रवेश झाल्यावर अनेकांनी पवार गटापासून फारकत घेत विरोधी भूमिका घेतली आहे.
मानेंच्या बंडखोरीने पाटलांची कोंडी
शरद पवार गटात पाटील यांच्या प्रवेशाला प्रवीण माने यांनी प्रखर विरोध केला. मात्र प्रवेश झाल्यावर माने यांनी अलिप्त भूमिका घेऊन विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला व बंडखोरी केली आहे, त्यामुळे ही बंडखोरी जातीय समीकरणात पाटील यांना अडचणीची ठरणार आहे.
जगदाळे, शहांकडून विश्वासघाताचा आरोप
जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व कर्मयोगीचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी आमचा विश्वासघात केल्याचा आरोप पाटील यांच्यावर केला आहे. शब्द देऊनही तो पाळला जात नाही. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत हिरिरीने काम करणारे जगदाळे व शहा यांनी विरोधी भूमिका घेतली आहे.