Ajit Pawar Baramati ( Marathi News ) : "लोकसभा निवडणुकीच्या काळात तुम्ही बोलत नव्हता, पण तुम्ही मनातून ठरवलं होतं. त्यावेळी तुमच्यामध्ये एक अंडरकरंट होता. तेव्हा काहीजण म्हणत होते, ताई निवडणुकीत पडल्या तर साहेबांना या वयात कसं वाटेल? त्यामुळे तुम्ही तेव्हा ताईला मतदान केलं. पण आता विधानसभेची निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत ताईला मतदान करून तुम्ही साहेबांना खूश केलं, आता विधानसभा निवडणुकीत मला मतदान करून खूश करा," असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार हे सध्या बारामती मतदारसंघात गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र त्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये सुळे यांना मताधिक्य मिळालं. अजित पवार ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्या बारामती विधानसभा मतदारसंघातही सुळे यांनी तब्बल ४८ हजारांचं मताधिक्य घेतलं होतं. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूकही अजित पवारांसाठी सोपी राहिली नसल्याने त्यांनी गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
अजित पवार हे काल बारामती तालुक्यातील एका गावात गेले असता त्यांनी लोकांना आता भावनिक न होण्याचं आवाहन केलं. "लोकसभेला तुम्ही दिलेला निकाल मी स्वीकारला आहे. मात्र आता आपल्या भागाच्या विकासासाठी तुम्ही मला मतदान करा. लोकसभेला तुम्ही सुप्रिया सुळे यांना निवडणूक दिलं आहे. आता विधानसभेला घडाळासमोरील बटन दाबून मला विजयी करा. ते त्यांच्या पद्धतीने तालुक्याचा विकास करतील, मी माझ्या पद्धतीने विकास करेन," असं यावेळी अजित पवारांनी म्हटलं आहे.