पुणे : लखीमपूर हत्या, वर्षभराचे शेतकरी आंदोलन याकडे पंतप्रधान लक्ष द्यायला तयार नाहीत. नागरिकांचा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहचावा या उद्देशाने बंद पुकारला आहे असे महाविकास आघाडीने स्पष्ट केले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी पुण्यात काँग्रेस भवनमध्ये शुक्रवारी दुपारी महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबर ला पुकारलेल्या बंद मागची भूमिका विषद केली.
''केंद्र सरकारबद्दल देशात तीव्र नाराजीची भावना आहे. शेतकरी आंदोलन, लखीमपूर प्रकरण, राज्यातील नेत्यांच्या नातेवाईकांना सरकारी एजन्सीचा वापर करून त्रास या सर्व प्रकारांबद्दल जनतेत संताप आहे. महाराष्ट्र नेहमीच देशहिताच्या भूमिकेतून काम करत आला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीने पुढाकार घेत पंतप्रधानांच्या कानापर्यंत आवाज जावा म्हणून बंद पुकारला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.''
आमदार चेतन तुपे, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, रिक्षा पंचायतीचे नितीन पवार, लोकायत चे नीरज जैन यावेळी उपस्थित होते. ''रिक्षा पंचायत, लोकायत यासारख्या समविचारी संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येईल, नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले.''
११ ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद 'ची हाक
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीने ' महाराष्ट्र बंद 'ची हाक दिली आहे. ११ ऑक्टोबर रोजी या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यव्यापी बंद पाळावा, असे आवाहन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी मिळून केले आहे.