पुणे : मराठा समाजातर्फे पुण्यात पुकारलेल्या बंदच्या दरम्यान चांदणी चौक भागात झालेल्या तोडफोडीत महामेट्रो कंपनीचे १५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
गुरुवारी मराठा समाजाने आरक्षणासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र बंद पुकारला होता.दोन वर्षांपूर्वी ९ ऑगस्ट रोजी क्रांतीचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे काढले. मात्र अद्यापही आरक्षण न मिळाल्यानं मराठा समाजानं 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली -होती. मात्र चांदणी चौकातही पुणे बंदला हिंसक वळण लागले. चांदणी चौकात आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला होता या भागात अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. त्यावेळीझालेल्या तोडफोडीत महामेट्रोचेही नुकसान झाल्याचे समोर आले.
आंदोलकांनी वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम बंद ठेवण्याचे आवाहन केले होते, ते मान्य करून काम बंद ठेवले असतानाही तोडफोड झाल्याबद्धल अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. संतप्त जमावाने मेट्रोच्या जेसीबी यंत्राच्या काचा तोडल्या. वाहतूक विषयक सुचना देणाऱ्या एलईडी स्क्रीनचे नुकसान केले. बॅरिकेटस तोडले. हे नुकसान लक्षात घेता मेट्रो एकूण १५ लाख रूपयांचे आहे अशी माहिता अधिकाºयांनी दिली. मेट्रो ही सार्वजनिक कंपनी आहे. तिचे नुकसान करणे योग्य नाही असे मतही काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.