पुणे - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यात सुरुवात झाली असून शहरातील बहुतांश भाग पूर्ण बंद आहे. शिवाजीनगर आणि स्वारगेट बस स्थानकावरील बस सेवा बंद असून संपूर्ण शहरात आणि संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. काल जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. आज शहरात मराठा युवकांची मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.
शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी 9 ऑगस्ट रोजी क्रांतीचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे काढले. मात्र अद्यापही आरक्षण न मिळाल्यानं आज मराठा समाजानं 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. त्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक वगळता इतर सर्व जिल्ह्यात बंद सुरु झाला आहे.
(Maharashtra Bandh Live Updates: सोलापुरात टायर जाळून चक्का जाम)
पुण्यातील 7 तालुक्यांमधील इंटरनेट सेवा बंद
चाकण येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील इंटरनेट सेवा खंडीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दौंड, भोर, बारामती, खेड, शिरुर, जुन्नर आणि मावळ या तालुक्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
पुणे शहरातील सद्यस्थिती
- शहरात बंद पाळण्यास सुरुवात
- सर्व शाळा, महाविद्यालये बंद, पुणे महापालिकेच्या शाळांनाही सुट्टी
- शिवाजीनगर, स्वारगेट बस स्थानकातून वाहतूक नाही
- शहरात मोठा पोलीस बंदोबस्त, पोलिसांच्या सुट्या रद्द
- पुण्यातील मार्केट यार्ड बंद, भाजीपाल्याची आवक नाही