पाषाण (पुणे): महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाषाणमध्ये कडकडीत बंद पाळून व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत पाठिंबा दर्शवला. यावेळी पाषाण मुख्य बाजारपेठ, सुस रोड, सुतारवाडी परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बाणेरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक महत्त्वाची दुकाने बंद करण्यात आली होती. तर काही दुकानदारांनी आपली दुकाने उघडी ठेवत व्यवसाय केला. यामुळे बाणेर बालेवाडी परिसरामध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले.
बंद दरम्यान औषधे व किराणा मालाची दुकाने तसेच खाद्य विक्रीची दुकाने उघडे ठेवण्यात येणार असल्याने ही दुकाने उघडी होती. पाषाण येथे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, समीर उत्तरकर, मंगेश निम्हण, दत्ता जाधव, संतोष तोंडे, महेश सुतार आदी कार्यकर्त्यांनी प्रशांत सुतारवाडी परिसरामध्ये बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते.
बाणेर-बालेवाडीमध्ये नगरसेवक बाबुराव चांदेरे शिवसेना उपशहरप्रमुख राजेंद्र धनकुडे, काँग्रेस उपशहर अध्यक्ष शिवाजी बांगर, जीवन चाकणकर, डॉक्टर सागर बालवडकर, दिलीप मुरकुटे, नितीन कळमकर, विशाल विधाते आधी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंद यशस्वी पार पाडण्यासाठी आवाहन केले होते. यावेळी शेतकरी कायदेविरोधात व शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी, व्यापारी संघटना सामाजिक संघटना यांनी बंद मध्ये सहभाग घेतला.