ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 25 - महाराष्ट्र बँक फसवणूक प्रकरणात सायबर सेलने आणखी एकाला अटक केली असून याप्रकरणी आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. स्वप्नील दिलीप विश्वासरावअसे त्याचे नाव असून प्रमुख सूत्रधारांपैकी एक असल्याची माहिती आहे.
युपीआय अॅपद्वारे खात्यात पैसे नसतानाही ६ कोटी १४ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणात सायबर सेलने आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे. स्वप्नील विश्वासराव याला पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली. पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले होते. विश्वासराव याने ६ जणांचे बँक खाते व लिंक मोबाईल घेऊन त्यावरुन एकूण ४७ व्यवहार केले.
त्याद्वारे ३७ लाख रुपयांचा अपहार झाला आहे. त्याच्या बँक खात्यात १४ लाख रुपये हस्तांतरीत झाले असून त्यापैकी ६ लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहे. उर्वरित ८ लाख रुपयांबाबत तपास करायचा आहे. हे व्यवहार करण्यासाठी ११ मोबाईलचा वापर करण्यात आला असून ते हँडसेट जप्त करायचे आहेत. विश्वासराव हा गणेश ढोमसे तसेच फरार आरोपी राजेश बुदुखळे, विनोद नायकोंडी, महेंद्र ढोमसे, संदीप मुळे यांनी मिळून हा गुन्हा केला आहे.
त्यानंतर ते सर्व फरार झाले होते़ त्यामुळे फरार आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली़ न्यायालयाने विश्वासराव याला ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़