पुणे : आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांच्यासह ६ जणांना बुधवारी अटक केली आहे़.
बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनोत (जयपूर), विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे (अहमदाबाद) तसेच चार्टर्ड अकाउंटंट सुनील घाटपांडे, डीएसके ग्रुपचे इंजिनिअरींग विभागाचे उपाध्यक्ष राजीव नेवसेकर यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे़
डी़. एस़. कुलकर्णी यांच्या डीएसकेडीएल या कंपनीने सोलापूर रोडला ड्रीम सिटी प्रकल्पासाठी जमिनी खरेदी करण्यास मार्च २००७ पासून सुरुवात केली होती़ बँकेच्या अधिकाऱ्यांनी डीएसकेडीएल या कंपनीशी संगनमत करुन त्यांच्या अधिकार व अधिकारांचा दुरुपयोग केला़ गैरवापर व गैरव्यवहार करून कंपनीला कर्ज मंजूर केले, असा ठपका ठेवून त्यांना आज आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़.
डी़ एस़ कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने जवळपास ३७ हजार पानी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे़ यावेळी पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीएसके यांना कर्ज देताना बँकांनी निष्काळजीपणा दाखविला असेल अथवा नियमांचे उल्लंघन केले असेल तर त्यांचीही चौकशी केली जाईल, असे जाहीर केले होते़. कर्जफेड न केल्याने महाराष्ट्र बँकेकडे गहाण असलेल्या डीएसके विश्वमधील मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार असल्याची जाहीर सूचना नुकतीच बँक ऑफ महाराष्ट्रने काढली होती़.