पुणे: ओमायक्रॉनचे रुग्ण ज्या बारा देशात आढळून आले आहेत त्या देशातून येणाऱ्या विमानांना महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी घालण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली. त्यासाठी नागरी विमान वाहतूक विभागाकडे राज्य शासन पत्रव्यवहार करणार आहे. त्यांनी प्रतिसाद न दिल्यास राज्यातील नागरिकांच्या हिताचा विचार करून विमाने बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागेल, अशीही चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यासाठी सोमवारी (दि. २९) पुण्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. कोरोनाचा नवीन ‘व्हेरिअंट’ जगातल्या काही देशांमध्ये आढळला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही ‘अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. या संबंधी विचारणा केली असता टोपे बोलत होते.
टोपे म्हणाले, “ओमायक्रॉन या नव्या व्हेरिअंटबद्दल राज्याच्या कृती दलाबरोबर आणि राज्याच्या संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्री व राज्याच्या आरोग्य विभागाने दोन बैठका घेतल्या. त्याचप्रमाणे मंत्रीमंडळाच्या बैठकीतही याबाबत सविस्तर चर्चा झाली. दक्षिण आफ्रिकेत डेल्टा व्हेरिअंटने बाधित असणाऱ्या रुग्णांचे रुपांतर आता ओमायक्रॉन व्हेरिअंटमध्ये झाले आहे. याचा अर्थ तो प्रभावी व बदलणारा विषाणू असल्याचे सिध्द होते.
''मात्र, या विषाणूच्या नव्या स्वरुपाची वैद्यकीय रुपरेषा अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्याची चाचणी आरटीपीसीआरने होऊ शकते ही जमेची बाजू आहे. त्याचा संसर्ग झाल्यानंतर उपचार पद्धत काय असावी, कोणती औषधे द्यावीत हे निश्चित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अवधी मागितला आहे. आणखी दोन ते तीन आठवड्यात यासंदर्भात आणखी स्पष्टता येईल, अशी माहिती मंत्रीमंडळासमोर मांडण्यात आली.”