पुणे : कर्नाटक विधानसभेची लढाई ऐन भरात आली आहे. आता काँग्रेस व भारतीय जनता पक्ष अशा दोघांनाही महाराष्ट्रातून अनेक शिलेदारांची रसद तिथे पाठवली आहे. पुण्यातून भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे व काँग्रेसचे कसब्यातील आमदार रवींद्र धंगेकर तिथे गेले आहेत. त्याशिवाय दोन्ही पक्षांच्या राज्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी तिथे मुक्काम ठोकला असून, त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
कर्नाटकमधील बेळगाव, निपाणी, कारवार व अन्य बराच मोठा भाग मराठीबहुल आहे. अनेक मराठी कुुटुंबे तिथे मागील कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्याशिवाय कर्नाटकच्या आतील भागातही काही वसाहतींमध्ये मराठी टक्का आहे. या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न देशातील या दोन प्रमुख राजकीय पक्षांकडून केला जात आहे. काँग्रेसने राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांची तिथे स्टार प्रचारक म्हणूनच नियुक्ती केली आहे.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी मागील अनेक दिवसांपासून कर्नाटकमध्ये आहेत. त्यांच्याकडे तेथील ८ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला मात दिलेले काँग्रेसचे आमदार धंगेकर यांनाही मराठीबहुल भागात चांगली मागणी असून, त्यांचे तिथे आकर्षण आहे. त्यांना मतदारसंघात फिरवले जात असून, काही कोपरासभाही घेण्यात येत आहेत.
भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे कित्तूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. तिथे ते पक्षाने नियोजन केले आहे, त्याप्रमाणे मतदान केंद्रनिहाय बैठका घेत आहेत. भाजपने त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे नियोजन केले आहे. केंद्रनिहाय बैठका, मतदान क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांबरोबर थेट संपर्क याप्रमाणे तिथे त्यांचे काम सुरू असल्याचे शिरोळे यांनी सांगितले. पक्षाचे महाराष्ट्र संघटनेतील अनेक पदाधिकारी कर्नाटकमध्ये मुक्कामी असून, ते नियोजनाप्रमाणे प्रचार करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जोशी यांनी सांगितले की, पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्याबरोबरच त्यांच्यात समन्वय तयार करण्याचे काम सुरू आहे. मतदारांचा काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसलाच सत्ता दिली होती, मात्र फोडाफोडीचे राजकारण करून भाजपने सत्ता बळकावली. त्याचा राग मतदारांमध्ये दिसतो आहे. दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांच्या तेथील स्थानिक नेत्यांसमवेत सभांचे आयोजन सुरू असल्याची माहिती जोशी यांनी दिली.
कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचा अखेरचा टप्पा आता सुरू आहे. महाराष्ट्रातून आता आणखी काही नेते कर्नाटकात नेले जाणार असल्याचे पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.