लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जयपूर येथे खेळल्या जाणाऱ्या वूमन्स सिनियर एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी (दि. १६) महाराष्ट्राने गोव्यावर ५५ धावांनी विजय मिळवला. नाणेेफेक जिंकून महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करत २४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात गोव्याचा संघ १८७ धावांवर बाद झाला.
महाराष्ट्राकडून अनुजा पाटील हिने सर्वाधिक ८८ धावा केल्या. अवघ्या ७४ चेंडूंत १४ चौकारांच्या मदतीने अनुजाने ही खेळी साकारली. ती अखेरपर्यंत नाबाद राहिली. सलामीवीर मुक्ता मगरेने ४७ धावांचे योगदान दिले. निर्धारित पन्नास षटकात सात फलंदाजांच्या मोबदल्यात महाराष्ट्राने २४२ धावा फलकावर लावल्या. गोव्याकडून रुपाली चव्हाणने आठ षटकात ४२ धावा देत तिघींना बाद केले. सुनंदा आणि तेजस्विनी दुरगड यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. या व्यतिरीक्त गोव्याच्या गोलंदाजांना चमक दाखवता आली नाही.
गोव्याचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेल्याने आव्हान उभे करु शकले नाहीत. मधल्या फळीतील तेजस्विनी दुरगडने ६५ चेंडूंमध्ये ६९ धावांची आकर्षक खेळी केली. तिने ६ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी केली. तिच्याव्यतिरीक्त विनवी गुरव (२९ धावा) आणि निकिता (३५ धावा) यांच्याव्यतिरीक्त कोणी चमक दाखवू शकले नाही. महाराष्ट्राकडून प्रियंका गारखेडेने भेदक गोलंदाजी करत दहा षटकांत ४ बळी टिपले. अनुजा पाटील, श्रद्धा पोखरकर यांनी प्रत्येकी दोन तर मुक्ता मगरे व माया सोनवणे यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. गोव्याचा डाव ४५.२ षटकात सर्वबाद १८७ धावांवर आटोपला.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : मुक्ता मगरे ४७, ऋतूजा देशमुख ३०, शिवाली शिंदे २०, अनुजा पाटील नाबाद ८८, सायली लोणकर २, अदिती गायकवाड २२, प्रियंका घोडके १४, प्रियंका गारखेडे १, उत्कर्षा पवार नाबाद ५, अतिरीक्त १३, ५० षटकात ७ बाद २४२, शिखा पांडे ८-३४-२, निकिता ७-३५, सुनंदा १०-५१-२, सोनाली २-८, रुपाली चव्हाण ८-४२-३, संजूला नाईक २-८, तेजस्विनी दुरगड १०-५३-२, दीक्षा गावडे ३-१०.
गोवा : विनवी गुरव २९, पूर्वजा वेर्लेकर १६, शिखा पांडे २, संजूला नाईक १२, तेजस्विनी दुरगड ६९, घडी ३, निकिता ३५, दीक्षा गावडे १०, सोनाली ६, रुपाली चव्हाण नाबाद ०, ४५.२ षटकात सर्वबाद १८७, प्रियंका गारखेडे १०-४१-४, उत्कर्षा पवार ९-३७, अनुजा पाटील ८.२-२९-२, श्रद्धा पोखरकर ५-१५-२, मुक्ता मगरे ७-२५-१, माया सोनवणे २-१४-१, प्रियंका घोडके ३-२०, सायली लोणकर १-५.