पुणे :ऊस दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चांगलेच पेटले आहे. परिणामी राज्यातील साखर उत्पादन घटले. १ नोव्हेंबरला सुरू झालेल्या साखर हंगामात आतापर्यंत केवळ ८ लाख टन साखर उत्पादन झाले. गेल्या वर्षी याच २३ दिवसांच्या काळात सुमारे १४ लाख टन साखर उत्पादन झाले होते. आंदोलनामुळे अद्याप ३० कारखाने सुरू झालेले नाहीत. त्यामुळे साखर उत्पादनात सहा लाख टनांची घट झाली आहे.
राज्यातील ऊस गाळप हंगाम यंदा १ नोव्हेंबर रोजी सुरू झाला; मात्र, ऊसदराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील काही साखर कारखाने अद्याप सुरूच होऊ शकलेले नाही. परिणामी साखर उत्पादनही घटले आहे.
गतवर्षी २३ नोव्हेंबरपर्यंत राज्यात ९१ सहकारी आणि ९२ खासगी असे १८३ कारखाने सुरू झाले होते. या कारखान्यांनी १६६ लाख टन उसाचे गाळप करून १४ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. सरासरी साखर उतारा ८.४ टक्के होता. मात्र, यंदा शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे आतापर्यंत ७६ सहकारी व ७८ खासगी असे एकूण १५४ कारखाने सुरू होऊ शकले आहेत. अर्थात गेल्या वर्षाच्या तुलनेत २९ कारखान्यांचे उत्पादन सुरू झालेले नाही. सुरू झालेल्या कारखान्यांनी आतापर्यंत १०५ लाख टन ऊसगाळप केले असून, त्यातून ८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ७.६१ टक्के मिळाला आहे.
आंदोलन सुरू असलेल्या कोल्हापूर विभागात १४ सहकारी आणि ८ खासगी कारखान्यांनी मिळून केवळ १४ लाख टन उसाचे गाळप केले. त्यातून १.१६ लाख टन साखरेचे उत्पादन होऊ शकले आहे.
विभागनिहाय सुरू झालेले कारखाने व उत्पादन :
विभाग : कारखाने गाळप (लाख टन) : उत्पादन (लाख टन) : उतारा (टक्के)
कोल्हापूर : २२ : १४.१३ : १.१६ : ८.२४
पुणे : २२ : २२.६६ : १.८४ : ८.१६
सोलापूर : ३८ : २४.३ : १.७७ : ७.३
नगर : २१ : १५.५३ : १.१६ : ७.५
संभाजीनगर : २२ : १२.५२ : ०.८ : ६.६१
नांदेड : २७ : १५.१२ : १.१५ : ७.६२
अमरावती : २ : १.३७ : ०.१ : ८.२५