पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून जुन्नर परिसरात बिबटे सफारी केंद्राचा गाजावाजा होत आहे. या केंद्रासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली असून, लवकरच ही सफारी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. हा प्रकल्प व्हावा म्हणून स्थानिकांची खूप वर्षांपासूनची मागणी होती.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीला बिबट्याची सफारी करण्यास मान्यता दिली होती. त्यापूर्वी जुन्नरला हा प्रकल्प करण्याचे ठरले होते. त्यानंतर पुन्हा बारामतीचा प्रस्ताव रद्द करून तोच प्रस्ताव जुन्नरमधील आंबेगव्हाण येथे होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. आंबेगव्हाण येथे वनविभागाची ४०० हेक्टर जमीन आहे. त्यातील १०० हेक्टरवर हा सफारीचा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. बिबटे सफारीचा मूळ प्रस्ताव हा जुन्नरमधील आंबेगव्हाण येथीलच आहे.
मानवी वस्तीपर्यंत आलेल्या बिबट्यांचा ‘सफारी’त समावेश
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांमध्ये बिबटे वावरत आहेत. सध्या हे बिबटे अनेक वेळा मानवी वस्तीत येत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मानवी मृत्यूंसह पशुधनाची देखील हानी होत आहे. या भागांतील उसाच्या शेतात हे बिबटे राहत आहेत. मानवी वस्तीपर्यंत आलेल्या या बिबट्यांना एकत्र करत बिबट्या सफारीची संकल्पना मांडलेली आहे. माजी आमदार शरद सोनवणे यांनी २०१८ मध्ये प्रथम ही कल्पना मांडली होती. त्यानंतर आमदार अतुल बेनके यांनीही केंद्रासाठी प्रयत्न केले.
बारामती सफारीचा प्रकल्प गुंडाळला !
महाविकास आघाडी सरकारच्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बिबट्या सफारी पार्क पुणे वनविभागात प्रस्तावित करत, त्यासाठी ६० कोटींची तरतूद केली होती. ही बिबट्या सफारी प्रकल्प बारामती तालुक्यातील गाडीखेल येथे होणार होता, पण नंतर एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प जुन्नरला होणार असल्याचे जाहीर केले होते. या अर्थसंकल्पात बारामती सफारीचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. त्यामुळे बारामती येथील सफारीचा प्रकल्प गुंडाळल्याचे दिसून येत आहे.
जुन्नर परिसरातील आंबेगव्हाण या ठिकाणी बिबटे सफारी केंद्रासाठी जागा निश्चित केली आहे. त्या केंद्रासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाली आहे. लवकरच त्या केंद्राच्या कामाला सुरुवात होईल.
- वैभव काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर वनविभाग