Maharashtra Cabinet Expansion: संग्राम थोपटेंना मंत्रिपद न मिळाल्याने भोरमध्ये समर्थकांनी जाळला फलक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 12:03 PM2019-12-30T12:03:52+5:302019-12-30T12:40:50+5:30
राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार काही मिनिटांवर येऊन ठेपलेला असताना मंत्रिपद न मिळालेल्या नाराजांच्या समर्थकांनी निषेध करण्यास सुरुवात केली आहे.
पुणे - राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार काही मिनिटांवर येऊन ठेपलेला असताना मंत्रिपद न मिळालेल्या नाराजांच्या समर्थकांनी निषेध करण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील भोरचे काँग्रेस पक्षातील आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसचे नाव असलेला फलक जाळून निषेध केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'भोर-वेल्हा-मुळशी' असा विस्तीर्ण मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात थोपटे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वीही त्यांच्या वडिलांनी याच भागातून राजकीय ठसा उमटवला आहे. त्यामुळे थोपटे गटाला यावेळी मंत्रिपदाची अपेक्षा होती. ती पूर्ण न झाल्याने संतप्त समर्थकांनी भोरमध्ये आंदोलन करत घोषणाबाजी केली. काँग्रेसचे भोर-वेल्हा विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांचं नाव मंत्रीपदाच्या यादीत नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झालेत. याशिवाय भोर नगरपालिकेच्या सर्व 20 नगरसेवकांसह इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे नगरपालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचे ही जाहीर करण्यात आले आहे.
Maharashtra Cabinet Expansion: 'हे' आहेत आज शपथ घेणारे 25 cabinet आणि 10 राज्यमंत्री https://t.co/PXc9XWRNLe
— Lokmat (@MiLOKMAT) December 30, 2019
राष्ट्रवादीच्या तीन मंत्रिपदांचा थोपटेंना फटका
राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि दत्तात्रय भरणे अशी तीन मंत्रिपद पुणे जिल्ह्यातून दिली. त्यातली बारामतीमधून पवार आणि इंदापूरमधून भरणे हे दोघेही बारामती सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा मतदारसंघात येतात. त्यातच भोर मतदारसंघही बारामतीत असल्यामुळे तिसरे मंत्रिपद देणे शक्य नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्रिपद निश्चितीची फटका थोपटे यांना बसल्याची चर्चा आहे.
Mahavikas Aghadi Ministry Expand :काँग्रेसचे 'हे' नेते घेणार शपथ; प्रणिती शिंदेंची संधी हुकलीhttps://t.co/GqWQ460VUA
— Lokmat (@MiLOKMAT) December 30, 2019
महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36 नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. आदित्य ठाकरेसुद्धामंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात 25 कॅबिनेट मंत्री असणार आहेत. तर 10 राज्यमंत्री असतील.
Mahavikas Aghadi Ministry Expand ठाकरे सरकारमध्ये 'आदित्य', पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात घेणार शपथ https://t.co/MuknAxmvL6
— Lokmat (@MiLOKMAT) December 30, 2019
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सहीचं पत्र लोकमतच्या हाती लागलं असून त्यामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावाची यादी देण्यात आली आहे. या यादीत 25 व्या नंबरवर आदित्य ठाकरेंचं नाव आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जुन खर्गे हेही मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात सोमवारी दुपारी एक वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा मंत्र्यांच्या नावांची यादी राजभवनावर पाठविली आहे. उद्धव ठाकरेंच्या सहीची ही यादी हाती लागली आहे. आदित्य यांचं नाव गुप्त ठेवण्यात आलं होतं, शेवटपर्यंत कोणालाही आदित्य मंत्रिमंडळात येणार आहेत याचा सुगावा लागू दिला नव्हता. मात्र, राज्यपालांकडे जेव्हा रात्री उशिरा यादी गेली, त्यात आदित्य ठाकरेंचे नाव कॅबिनेट मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्र्यांच्या यादीत सगळ्यात शेवटचे नाव असल्याचे समजते.
Mahavikas Aghadi Ministry Expand : सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री, अजित पवारांचा होणार शपथविधी https://t.co/xlGIHu2jMf
— Lokmat (@MiLOKMAT) December 30, 2019