पुणे : मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात १00 टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळपासून सर्व व्यवहार बंद होते. सर्वत्र शांततेत आंदोलन करण्यात आले. सर्व तालुक्यात तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करून आरक्षणाची मागणी करण्यात आली. बारामतीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या गोविंद बागेसमोर आंदोलकांनी ठिय्या मारला. यात अजित पवार स्वत: सहभागी होवून निवेदन स्विकारले. सासवडला सरकारच्या नावाने जागरण गोंधळ घालण्यात आला. एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी, कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, जय जय जय जिजाऊ, आले रे आले मावळे आले, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, रक्ता रक्तात भिणलंय काय, जय जिजाऊ जय शिवराय, तुमचे आमचे नाते काय... जय जिजाऊ जय शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ की जय आदी घोषणांनी परिसर दुमदुमला.गेल्या आठवड्यात चाकण येथे आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे सर्वांचे चाकणकडे लक्ष लागले होते. पोलिसांनी वारंवार बैैठका घेवून शांततेचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत येथे शांततेत आंदोलन करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या तुरळक दुचाकी वगळता रस्त्यावर चार चाकी गाड्यांचे दर्शन दुर्लभ झाल्याने पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव रस्ता व चाकण-शिक्रापूर रस्त्यावर शुकशुकाट होता. चाकण औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधील यंत्रांचा खडखडाट आज शांत होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. ९) क्रांतीदिनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माळेगांव येथील ‘गोविंदबाग’या निवासस्थानासमोर रस्त्यावर ३ तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. तसेच मराठा क्रांती मोर्चा समवेत घोषणा दिल्या.याव्यतिरिक्त बारामती शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.इंदापूर शहरातील पंचायत समितीसमोरील जुना पुणे - सोलापूर महामार्गावर रस्ता रोको करत ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलना दरम्यान महामार्गावर अपघात झाल्याने दोन अम्ब्युलन्स जलद गतीने आले, त्याला आंदोलकांनी त्वरित वाट करून दिली. सासवडच्या शिवर्थावर सरकारच्या नावाने जागरण गोंधळ घालण्यात आला. पुरंदर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले. भोर शहर १०० टक्के बंद ठेवून सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला. चौपाटीवरून मोर्चा काढून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मोर्चा शांततेत पार पडला. या वेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर मोर्चात मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि तरुण-तरुणी सहभागी झाले होते. पूर्व हवेली तालुक्यात सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपले अर्थिक व्यवहार बंद ठेवत बंदला प्रतिसाद दिला. तालुक्यात महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या उरुळी कांचनसह सोरतापवाडी, कुंजीरवाडी, शिंदवणे, कोरेगावमूळ, पेठ, नायगाव, अष्टापूर, भवरापूर , टिळेकरवाडी , पिंपरी सांडस , न्हावी सांडस , हिंगणगाव , शिंदेवाडी आदी गावांत बंद शांततेत व उत्स्फूर्तपणे पाळण्यात आला. आंबेगाव तालुक्यात उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला़ मंचर व घोडेगाव शहरात अत्यावश्यक सेवा वगळता १०० टक्के बंद पाळण्यात आला़ मंचर शहरातून मोर्चा काढून शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले़ या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला़.नारायणगाव व वारूळवाडी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार यांनी दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठा ओस पडल्या होत्या. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील सर्व इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.
........................
मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला चाकण व औद्योगिक क्षेत्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मेडिकल व हॉस्पिटल वगळता सर्वत्र गुरुवारी ( दि. ९ आॅगस्ट ) कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकरिता सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणाकरिता सुरु असलेल्या आंदोलनातील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठी खबरदारी घेण्यात आली होती. पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव रस्ता व चाकण-शिक्रापूर रस्त्यावर शुकशुकाट होता. औदयोगिक कारखान्यांनी साप्ताहिक सुट्टीत बदल करून गुरुवारी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. शहरासह आजूबाजूच्या गावातील दुकाने बंद ठेवल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. विविध ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, कारखानदारी, पेट्रोलपंप तसेच सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने तळेगाव चौकापासून दोन किलोमीटर पर्यंत छायाचित्रण करता येईल या क्षमतेचे ड्रोन शूटिंग कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे जॉईंट पोलीस कमिशनर मकरंद रानडे, मुंबई गोरेगाव विभागाचे पोलीस अधिक्षक राजकुमार शिंदे यांनी चाकण पोलीस ठाण्याला भेट दिली. ————खेड तालुक्यात देखील बंद ला शंभर टक्के पाठिंबा देण्यात आला.खेड तालुका मराठा समाजाच्या वतीने चाकण येथे दुपारी दीडच्या सुमारास पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मराठा मोर्चाचे प्रदेश समन्वयक व आयोजक मनोहर वाडेकर, डॉ. विजय गोकुळे, गणेश पऱ्हाड , अनिल सोनवणे, अतिश मांजरे, व्यंकटेश सोरटे, काळुराम कड, कालिदास वाडेकर, अनिल देशमुख, राहुल नायकवाडी, संजय वाडेकर, वैभव परदेशी, हेमंत काळडोके, आदी उपस्थित होते.