पुणे : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. तसेच पुणे शहरातील मंगळवारी दिवसभर ढगांची गर्दी आणि पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर बुधवारी पावसाने विश्रांती घेतली आणि गुरूवारी तर सूर्यनारायणाने दर्शनही दिले. त्यामुळे दिवसा पुणेकरांना थंडीपासून जरासा दिलासा मिळाला. परंतु, आता मकरसंक्रांतीला चांगलीच थंडी पडण्याची शक्यता ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण गुरुवार ( दि.११) पासून निवळून हळूहळू पहाटेच्या किमान तापमानाचा पारा २ ते ३ डिग्रीने घसरून सरासरीच्या सामान्य पातळीत पोहोचेल. येत्या २-३ दिवसानंतर अजून खाली घसरण्याची शक्यता आहे. संक्रांती दरम्यान चांगली थंडी जाणवण्याची अपेक्षा आहे. विशेषतः विदर्भात उद्यापासूनच (दि.११) चांगली थंडी पडू शकते. अर्थात सध्या लगेचच थंडीच्या लाटीची अपेक्षा नाही. एका मागे एक पश्चिमी झंजावात साखळी उत्तर भारतात सुरूच असून, १२ जानेवारीला मध्यम प. झंजावात वायव्येकडून येत आहे. ही स्थिती आपल्याकडील येणाऱ्या अपेक्षित थंडीला पूरक ठरू शकते, असे खुळे यांनी सांगितले.
पुण्यात दुपारी कडक उन्ह
पुणे शहरात दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणातून गुरूवारी पुणेकरांची सुटका झाली. दुपारी १२ नंतर कडक उन्ह पडले होते. सकाळी शिवाजीनगरला १७.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. यापुढे दोन दिवसांमध्ये थंडीचा कडाका जाणवेल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात पाऊस-
पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाची नोंद झाली. आंबेगाव ४ मिमी, चिंचवड ३.५, दौंड ३.५, राजगुरूनगर २.०, बारामती ०.५, नारायणनगाव ०.५ मिमी पावसाची नोंद झाली.
राज्यामध्ये आजपासून कोरडे हवामान राहणार आहे. तर पुण्यातील आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सकाळी तुरळक ठिकाणी धुके पडू शकते. किमान तापमानात घट होईल, परंतु, ते १० अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता नाही.
- अनुपम कश्यपी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे
दक्षिणेतील हिवाळी पावसाचा हंगाम आटोपण्याची शक्यता असताना, अजूनही केरळ राज्यात पावसाचा जोर कायम आहे. त्याच्याच परिणामातून महाराष्ट्रात आता जसे दोन दिवस वातावरण बदलले. तसेच दोन दिवसही वातावरणात बदलेल. तीन आठवडे उलटले तरी दाट धुक्यापासून पंजाब हरियाणा उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये अजून चालूच आहे. व अजूनही काही दिवस ही स्थिती राहू शकते. त्याचाच परिणाम आपल्याकडील खानदेशातील जिल्ह्यात होत आहे.
- माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ