पुणे : सध्या उत्तरेकडे बर्फ पडत असून, आपल्याकडे आता हवामानात बदल होत आहे. किमान आणि कमाल तापमानात घट होत आहे. १५ नोव्हेंबरनंतर थंडी पडायला सुरुवात होईल आणि यंदा सर्वसाधारण थंडी पडणार असल्याची माहिती हवामानशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली. सध्या पुणे शहरासह राज्यभरातील हवामान बदलत आहे. ऑक्टोबर हिटचा परिणाम हळूहळू कमी होत असून, थंडीची चाहूल सुरू झाली आहे. कमाल आणि किमान दोहीमध्ये घट होऊ लागली आहे.
राज्यातील तापमानातही घट झालेली पहायला मिळत आहे. त्यामुळे पहाटे थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. पण अजूनही राज्यातील बहुतांश भागात दुपारी ऑक्टोबर हीटचा चटका आहे. राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढेल असा अंदाज आहे.
राज्यातील विविध भागात सकाळी आणि संध्याकाळी धुके पडत असून, थंड वारा अंगाला स्पर्श करत आहे. राज्यात पुढील पाच दिवस मुख्यत: कोरडं हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील जळगाव येथे तापमानाचा पारा १३.२ अंश सेल्सियसपर्यंत घसरला आहे. त्यात आणखी घट होईल, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
सध्या उत्तरेकडे जम्मू काश्मीर इथे बर्फ पडत आहे. त्यामुळे थंड वारे आपल्या राज्याकडे वाहत आहे. त्यामुळे आता थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात किमान आणि कमाल तापमानात हळूहळू घट होत आहे. १५ नोव्हेंबरनंतर थंडीत वाढ होईल, अशी माहिती हवामानशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली.