पुणे : व्यापारी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन होण्यात महाराष्ट्राचे एक ट्रिलियन योगदान अपेक्षित आहे. यात महाराष्ट्राचे भरीव योगदान असेल, असे मत पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले. दी पूना मर्चंट्स चेंबरतर्फे राज्याच्या मंत्रिमंडळातील नव्याने नियुक्त मंत्री, खासदार व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, आमदार चेतन तुपे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी दी पूना मर्चंट्स चेंबर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड ॲग्रीकल्चर (मुंबई), फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई), चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रिज अँड ट्रेड (मुंबई), दी ग्रेन, राईस अँड ऑईल सीडस् मर्चंटस् असोसिएशन (मुंबई) कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (दिल्ली) व पुणे व्यापारी महासंघ अशा विविध व्यापारी संघटनांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया, दी पूना मर्चंट्स चेंबरचे उपाध्यक्ष अजित बोरा, सहसचिव आशिष दुगड, ज्येष्ठ उद्योगपती राजेश शहा, माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले तसेच विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
रावल पुढे म्हणाले, व्यापाऱ्यांना सर्वस्तरावर पाठबळ देऊन व्यापार करण्यासाठी लागणाऱ्या परवान्यांपासून वितरणापर्यंत सर्व व्यवस्था मजबूत करण्यात येईल. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पारंपरिक कृषी क्षेत्र मोठा वाटा उचलत असताना, शेतकरी मात्र विकासापासून वंचित राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत माल पोहोचत असताना होणारे त्याचे नुकसान टाळण्यासाठीदेखील यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
यावेळी राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, दी पूना मर्चंट चेंबरला ज्या समस्या भेडसावत होत्या, त्या आम्ही आजवर सोडवत आलेलो आहोत. भविष्यातही या समस्या आम्ही सोडवू.यावेळी क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, दी पूना मर्चंट चेंबर ही केवळ व्यापाऱ्यांची संघटना नसून समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची जाणीव बाळगणारी सामाजिक संघटना आहे.