पुणे : राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ९० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यात बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे ३४ हजार हेक्टरचे नुकसान झाले असून नाशिक व नगर जिल्ह्यांत द्राक्षासारख्या व्यापारी पिकांना मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. राज्यातील सुमारे १७ जिल्ह्यांमध्ये या पावसाने शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. विदर्भातील संत्रा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात शनिवारी व रविवारी पाऊस झाला. त्यात रविवारी सुमारे १७ जिल्ह्यांना अवकाळी पाऊस व गारपिटीने चांगले झोडपून काढले. त्यामुळे शेतांमधील उभी पिके जमीनदोस्त झाली असून त्यात प्रामुख्याने द्राक्ष, कांदा, डाळिंब, टोमॅटो यासारख्या पिकांचा समावेश आहे.
राज्यात सोमवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासांमध्ये ठाणे जिल्ह्यात १८, पालघर २६, नाशिक २७, धुळे २६, नंदूरबार ६२, जळगाव ३२, नगर ३१, पुणे १४, संभाजीनगर ६१, जालना ७१, बीड २७, नांदेड ३६, परभणी ६५, बुलढाणा ६०, अकोला ३२, वाशिम ५०, अमरावती १४, यवतमाळ २७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पूर्व विदर्भ वगळता राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद करण्यात आली.
गारपिटीमुळे झालेले नुकसान मोठे असून नाशिक, नगर व नंदुरबार जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा व टोमॅटो पिकांना मोठा फटका बसला आहे. कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यात सुमारे ३४ हजार हेक्टर इतके झाले असून नाशिक जिल्ह्यातही सुमारे ३० हजार हेक्टरी पिकांना या गारपिटीचा व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. नगर जिल्ह्यात सुमारे १५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून पुणे जिल्ह्यात सुमारे ३ हजार ५०० हेक्टर, धुळे जिल्ह्यात ४ हजार ६००, नंदुरबार जिल्ह्यात २००० त्याचप्रमाणे ठाणे, पालघर, जळगाव, सातारा, जालना, संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजात व्यक्त करण्यात आले आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे संत्रा पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या स्वयंचलित पर्जन्यमान केंद्रांवर पावसाची नोंद होत असली तरी गारपिटीची नोंद करणे शक्य नसल्याने त्याची तीव्रता नेमकी किती व कशी होती, याची नोंद करण्याची यंत्रणा नसल्याने हे नुकसान आणखी वाढू शकते, असे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई अशा पिकांना मात्र या पावसाचा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.
या पावसामुळे संत्र्याचा अंबिया बहारासाठीचा ताण तुटला. त्यामुळे येणारा बहर हाती येणार नाही. या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.
- संदीप घुले, सर्फापूर, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती
पुढील काही दिवस राज्यात अजूनही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मदत व पुनर्वसन विभागाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिल्यानंतर कृषी विभाग पंचनाम्याचे काम सुरू करेल.
- प्रवीण गेडाम, आयुक्त, कृषी