Maharashtra Election 2019 : भाजपच्या ‘त्या’ निर्णयाने अजित पवार बुचकळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 01:44 PM2019-10-05T13:44:29+5:302019-10-05T13:45:00+5:30
भाजपने चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना उमेदवारी नाकारली, याचे मलाही आश्चर्य वाटले....
बारामती : भाजपने चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना उमेदवारी नाकारली, याचे मलाही आश्चर्य वाटले. अर्थात हा त्या पक्षाचा अधिकार आहे, त्यामुळे त्यावर अधिक बोलणार नाही. कदाचित त्यांच्यावर वेगळी जबाबदारी सोपविली जाईल. या निर्णयाने बुचकळ्यात पडल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अमित शहा व चंद्रकांत पाटील यांचा हा अधिकार आहे, हे सांगायला पवार विसरले नाहीत.
माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजपने विद्यमान मंत्र्यांना दिलेल्या डच्चूबाबत बुचकळ्यात पडल्याचे सांगितले. तत्पूर्वी पवार यांनी शुक्रवारी (दि. ४) बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील कसब्यातून गुनवडी चौक, इंदापूर चौकमार्गे त्यांची मिरवणूक काढण्यात आली. सुरुवातीला त्यांनी आईचा आशीर्वाद घेत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार अर्पण करून पवार यांनी अर्ज दाखल केला. या वेळी पवार यांच्यासमवेत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, किरण गुजर, सतीश काकडे अर्ज दाखल करताना उपस्थित होते. पवार म्हणाले, गोपीचंद पडळकर हे बाहेरचे उमेदवार आहे असे नाही. कोणालाही कोठेही उभे राहता येते, हा घटनेने दिलेला अधिकार आहे. मी प्रचार करतानाही बाहेरचा उमेदवार असा प्रचार करणार नाही. आपण एक लाख मताधिक्याने विजयी होऊ. आजचे वातावरण विचारात घेता हे मताधिक्य वाढेल. बारामतीकरांचा विशेषत: युवक व महिलांमध्ये कमालीचा उत्साह आहे, बारामतीकर माझ्यावर किती प्रेम करतात हेच आजच्या मिरवणुकीने दिसून आल्याचे पवार म्हणाले.