Maharashtra Election 2019 : बारामतीमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत अजित पवार यांचा अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 12:59 PM2019-10-04T12:59:48+5:302019-10-04T13:03:04+5:30
बारामती विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीतर्फे अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
पुणे - बारामती विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीतर्फे अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी कसब्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून मिरवणुकीची सुरुवात झाली. तिथून गुणवडी चौक, इंदापूर चौक मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बारामती येथील प्रशासकीय भवन येथे अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा पार्थ आणि जय यांनीही सहभाग घेतला होता.
बारामतीच्या चौकाचौकात पवार यांचे स्वागत करण्यात आले. बारामती विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार सुरू होण्यापुर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे चर्चेत आला आहे. शुक्रवारी (4 ऑक्टोबर) अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी पवार यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पवार यांच्या स्वागतासाठी समर्थक नगरसेवक सत्यव्रत काळे यांनी चक्क 500 किलोचा पुष्पहार तयार केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने बारामती विधानसभा नेहमीच राज्यात लक्षवेधी ठरतो. राज्यात सर्वाधिक चर्चा याच मतदारसंघाची होते. आजपासुन ही चर्चा अधिक रंगणार आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पवार यांच्यासह भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या प्रचाराचा शुभारंभ देखील होणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे.
भाजपाचे मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी गुरुवारी नवी मुंबईत केला होता. तर अजित पवारांनी खडसे कोणाच्याही संपर्कात नव्हते, माझ्या आणि जयंत पाटील यांच्याही नाही, असं सांगितलं. त्यामुळे पवार काका-पुतण्यांच्या विधानांमध्येच विसंगती असल्याचं समोर आलं आहे.
अजित पवार म्हणाले की, भाजपाने कोणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांचा आहे. राजकीय कार्यकर्ता म्हणून मीही बुचकळ्यात पडलो, विनोद तावडे, प्रकाश मेहता असतील किंवा खडसे, बावनकुळे यांना उमेदवारी नाकारतील, असं मलाही वाटलं नव्हतं. खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हते, मी काल सकाळपासून मुंबईतल्या राष्ट्रवादी भवनमध्ये बसलो होतो. त्यावेळी मीच काही चॅनलवर पाहिलं की अजित पवार हेलिकॉप्टरमध्ये बसले. अजित पवारांचं हेलिकॉप्टर आता जळगावला रवाना झालंय. अजित पवारांनी बीडचा हेलिकॉप्टरचा दौरा रद्द केला नि जळगावचा दौरा सुरू केला, पण असं काहीही झालेलं नव्हतं.