पुणे : या सरकारने पाच वर्षात काय केलं हे सांगावे. कलम ३७० हे काही महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंधित नाही असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यात केले.
भाजपच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी काश्मीरमधून हटवलेले कलम ३७० हा मुद्दा आहे. या मुद्द्यावर आता विरोधक उत्तर देऊ बघत आहेत. याच मुद्दयावर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित बैठकीआधी पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, 'इथे बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या असे अनेक प्रश्न आहेत.जातीयवाद उफाळतो आहे मात्र त्यावर सत्ताधारी काही बोलत नाहीत. ही देशाची निवडणूक नाही. राज्याची निवडणूक आहे. कलम ३७०चा मुद्दा राज्यात नाही असेही ते म्हणाले.
मंगळवारी झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, “अजित पवारांच्या डोळ्यात पाणी आलेलं महाराष्ट्रानं पाहिलं. ते पाणी पाहून मला मगरीचे अश्रूच आठवले. तुमच्याकडे जेव्हा माझा शेतकरी पाणी मागायला आला तेव्हा तुम्ही त्याला उदाहरण काय दिलं? आठवा. काय बोलला होतात ते विसरु नका.” आता त्यावर पवार यांनी उत्तर दिले आहे.
पवार म्हणाले की, ' 5 वर्ष शिवसेना सरकारमध्ये होती. त्यांनी फक्त पोकळ आश्वासन दिली. राज्यात बेरोजगारी ,शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, त्याच उत्तर त्यांनी द्यावे. पीक विमा का मिळाले नाहीत असा सवालही त्यांनी विचारला. मी कसा आहे ते लोकांना माहिती आहे. माझे अश्रू मगरीचे आहेत की कशाचे हे तपासायचं काम उध्दव ठाकरे कधीपासून करायला लागले असंही ते म्हणाले.