विशाल शिर्के
मतदारसंघाच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये खडकवासला मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात ग्रामीण मतदार तुलनेने अधिक आहेत. किरकटवाडी, सोनापूर, सांगरून, खेड-शिवापूरचा ग्रामीण भाग आणि धनकवडी, वारजे, नऱ्हे आंबेगाव आणि कोथरूड, सिंहगड रस्त्याचा काही शहरी भाग या मतदारसंघात येतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाचे भीमराव तापकीर यांना मतदारांनी दोनदा संधी दिली. या मतदारसंघातील भागावर राष्ट्रवादीचे वर्चव राहिले आहे. आजही आजी-माजी नगरसेवक राष्ट्रवादीचेच अधिक आहेत. खुद्द तापकीर वास्तव्यास असलेल्या वॉर्डमधे तीन नगरसेवक राष्ट्रवादीचेच आहेत.असे असतानाही राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नाही. राष्ट्रवादीची असलेली जास्त ताकदच तिला घातक ठरली आहे. इतक्या दिवस आपल्या आजूबाजूला असलेली व्यक्ती आपल्या डोक्यावर नको असल्यानेच राष्ट्रवादीला यश मिळालेले नाही.त्या उलट भाजपचे या भागात फारसे अस्तित्व नव्हते. त्यामुळे कोणी कुरघोडी करण्याचा प्रश्नच नाही. तापकीर यांना नगरसेवकाचे तिकीट देण्यातही सुरुवातीला दिवंगत सतीश मिसाळ यांचा महत्त्वाचा वाटा होता. पुढे वांजळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर तापकीर यांना संधी मिळाली.राष्ट्रवादीने आमदार वांजळे यांच्या पत्नी हर्षदा यांना ऐनवेळी तिकीट दिलेले मतदारांना रुचले नाही. तापकीर विजयी झाले. पुढच्या निवडणुकीत मोदी लाटेच्या जोरावर शहरात आठही जागांवर भाजप आले. मतदारसंघ अजूनही वाहतूककोंडी, मंडई, करमणूक केंद्र, उद्याने, मैदान अशा पारंपरिक प्रश्नातच अडकले आहे. भाजपच्या उमेदवाराला प्रतिस्पर्धीच नसल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. भाजपची लढत राष्ट्रवादीशी असली तरी, राष्ट्रवादीची खरी लढत ही पक्षातील नेत्यांशीच आहे.
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य २०१४च्या निवडणुकीत याच भागाने घटविले होते. मात्र, २०१९च्या निवडणुकीत स्थानिकांनी एकदिलाने केलेल्या प्रचारामुळे सुळेंचे मताधिक्य लाखावर गेले. त्याच पद्धतीने पक्ष म्हणून काम केल्यास राष्ट्रवादी भाजपला टक्कर देऊ शकते. तूर्तास, दोन्ही पक्षांनी पदयात्रा, रॅली, सभा आणि प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटींनी वातावरण तयार केले आहे........बरे झाले रमेश कोंडेंनी माघार घेतली!शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे हे खेड-शिवापूर परिसरातील. त्यांचे आप्तेष्ट हे कात्रज, धनकवडी, नºहे आंबेगाव आणि परिसरात राहणारे. त्यांनी या भागात गेली पाच वर्षे सातत्याने संपर्क ठेवला होता. सुख-दु:खाच्या प्रसंगात ते हजर असत. त्यांची बंडखोरी कायम राहिली असती, तर अर्थातच भाजपला फटका बसला असता. त्यांच्या माघारीने भाजपवाले, बरे झाले कोंडेंनी माघार घेतली, असेच म्हणत असतील.