पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काेथरुडमधून उमेदवारी जाहीर हाेताच सर्वप्रथम अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने त्यांना विराेध केला हाेता. त्यावेळी त्यांची उमेदवारी मागे न घेतल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ब्राह्मण महासंघाने जाहीर केले हाेते. अखेर आज चंद्रकांत पाटील यांच्या विराेधात काेथरुडमधून ब्राह्मण महासंघाकडून मयुरेश्वर अरगडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या काेथरुड विधानसभा मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. पाटील यांच्या उमेदवारीला अनेकांनी विराेध केला. त्यांच्यावर बॅनरबाजीच्या माध्यमातून टीका देखील करण्यात आली. ब्राह्मण महासंघाने सुरुवातीलाच पाटील यांच्या उमेदवारीला विराेध केला हाेता. काेल्हापूरच्या मंदिरात जेव्हा ब्राह्मण पुजारांच्या प्रश्न आला तेव्हा पाटील यांनी माैन बाळगले तसेच संभाजी बागेतून राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविल्यानंतरही पाटील यांनी कुठलिही कारवाई केली नसल्याचा आराेप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आला हाेता. आता ब्राह्मण महासंघ पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. ब्राह्मण महासंघाचा एकमेव उमेदवार आता पाटील यांच्या विराेधात आपले नशीब आजमावणार आहे.
अर्ज भरल्यानंतर ब्राह्मण महासंघाचे उमेदवार अरगडे म्हणाले, सरकारने ब्राह्मण समाजासाठी काहीही केले नाही. आमचा चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला विराेध आहे. काेल्हापूरच्या मंदिरात जेव्हा ब्राह्मण पुजाऱ्यांचा प्रश्न आला तेव्हा पाटील यांनी माैन बाळगले. त्यांचे माैन म्हणजे एकप्रकारे समर्थनच हाेते. ब्राह्मण समाजाच्या समस्या त्यांनी साेडविल्या नाहीत. ब्राह्मण समाजाच्या आर्थिक सर्वेक्षणाचे केवळ आश्वासन दिले. पुण्याबाहेरचा उमेदवार काेथरुडकरांना नकाे आहे. पाटील यांना उमेदवारी देऊन ब्राह्मण समाजाला डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.