पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काेथरुडमधून उमेदवारी जाहीर हाेताच ब्राह्मण महासंघाने त्यांच्या उमेदवारीला विराेध केला हाेता. पाटील यांच्या विराेधात महासंघाने काेथरुड विधानसभा मतदार संघातून मयुरेश अरगडे यांना उमेदवारी दिली हाेती. तर राहुल जाेशी यांनी देखील ब्राह्मण महासंघाकडून उमेदवारी दाखल केली हाेती. चंद्रकांत पाटील यांच्यासाेबत काल ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने उमेदवारी मागे घेत असल्याची माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गाेविंद कुलकर्णी यांनी दिली.
पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ब्राह्मण महासंघाने सुरुवातीला पाटील यांच्या उमेदवारीला विराेध केला हाेता. काेल्हापूरच्या मंदिरात जेव्हा ब्राह्मण पुजारांच्या प्रश्न आला तेव्हा पाटील यांनी माैन बाळगले तसेच संभाजी बागेतून राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविल्यानंतरही पाटील यांनी कुठलिही कारवाई केली नसल्याचा आराेप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आला हाेता. तसेच गरीब ब्राह्मण मुलांसाठी आर्थिक विकास महामंडळ तयार करावे, पाेराहित्य करणाऱ्यांना महिना पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे, ब्राह्मण समाजासाठी अॅट्राेसिटी चा कायदा करावा अशा मागण्या देखील ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आल्या हाेत्या. या सर्व मागण्यांसंदर्भात पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पाटील यांना पाठींबा जाहीर केल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
कुलकर्णी म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्याशी आमची चर्चा झाली. त्या चर्चेतून समाधनकारक उत्तरे मिळाली. महासंघाच्या दाेन्ही उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. कसबा मतदारसंघामध्ये भाजपाच्या मुक्ता टिळक यांना पाठींबा देण्याचे ठरले असून काेथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांना आम्ही पाठींबा देणार आहाेत. राज्यातील इतर ब्राह्मण उमेदवारांना पाठींबा देण्याबाबत जिल्हास्तरावर निर्णय घेण्यात येणार आहेत.