पुणे : काेथरुड मतदारसंघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर हाेताच विराेधक त्यांच्या विराेधात काेणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. आघाडीमध्ये काेथरुडची जागा मित्र पक्षाला देण्याचे ठरविण्यात आले हाेते. अखेर काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने काेथरुडमधील मनसेचे उमेदवार किशाेर शिंदे यांना पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता काेथरुडमध्ये पाटील विरुद्ध शिंदे असा सामना रंगणार आहे.
काेथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. कुलकर्णी यांनी काेथरुडमध्ये पक्षाची चांगली बांधणी केली हाेती. सुरुवातीला उमेदवारी डावलल्याने कुलकर्णी या काहीशा नाराज हाेत्या. परंतु त्यांची समजूत काढण्यात पक्षाला यश आले. पाटील यांच्या उमेदवारीला पहिल्यापासूनच विराेध झाला. सुरुवातीला आमचा आमदार काेथरुडचा हवा असे लिहीलेले बॅनर लावण्यात आले तर नंतर शंभर टक्के नाेटा ला मतदान करणार असे बॅनर काेथरुडमध्ये लावण्यात आले. युतीत काेथरुड हा शिवसेनेचा मतदारसंघ हाेता. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते देखील काहीसे नाराज हाेते.
काेथरुडची जागा मित्र पक्षाला देणार असल्याचे अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जाहीर केले हाेते. राजू शेट्टी यांनी काेथरुडमधून उभे राहण्याची ऑफर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चाैधरी यांना दिली हाेती. परंतु राज ठाकरे यांनी काेथरुडमधून किशाेर शिंदे यांना उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मतांचे विभाजन टाळण्यासाठी चाैधरी यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. अखेर काेथरुडमध्ये मनसेच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि काॅंग्रेसचे नेते अभय छाजेड यांनी जाहीर केले आहे.