अन्वर खान - भोर- मुळशी- वेल्हे या दुर्गम भागातील भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे संग्राम थोपटे सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्ट्रिक साधणार की यंदा भाजप-सेना युती हा काँग्रेसचा गड काबीज करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. २००९, २०१४ साली आमदार संग्राम थोपटे यांनी एकतर्फी नव्हे, पण चुरशीच्या लढतीत विरोधक शिवसेनेवर मात केली होती. त्यामुळे यंदा तिसऱ्या विजयाची त्यांना आशा आहे. गतवेळी त्यांना शिवसेनेचेच कुलदीप कोंडे यांनी आव्हान दिले होते. मात्र, त्या वेळी भाजप-सेना युती नव्हती. त्याचा फायदा थोपटेंना मिळाला. तसे पाहता, भाजप-सेना यांना मिळालेली मते ही थोपटेंपेक्षा जास्त होती. त्यामुळेच यंदा हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला. त्यांना भाजपची जोरदार साथ मिळाल्यास थोपटेंपुढे निश्चितपणे आव्हान उभे राहू शकते, याची जाण थोपटेंना आहे. त्यामुळेच यंदा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व तालुक्यातील राष्ट्रवादीची मोलाची साथ त्यांना मिळत आहे. थोपटेंसाठी आघाडी धर्म पाळत सुप्रिया सुळे या दुर्गम भागात मतदारांशी संपर्क साधत कोपरा-कापरा पिंजून काढत आहेत. त्यांचा निश्चित फायदा थोपटेंना होणार आहे. लोकसभा निवडणुकीत थोपटेंच्या मतदारसंघाने सुप्रियातार्इंना चांगली साथ दिली होती. त्याची परतफेड यानिमित्ताने राष्ट्रवादीकडून होत आहे.भोरचा मतदारसंघ तसा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. अनंतराव थोपटे यांनी या मतदारसंघात सहा वेळा बाजी मारली आहे. फक्त १९९९मध्ये राष्ट्रवादीचे काशिनाथ खुटवड यांनी थोपटेंना पराभूत केले होते. पण, २००४ साली पुन्हा अनंतराव थोपटेंनी बाजी मारली. नंतर २००९पासून त्यांनी मुलगा संग्राम थोपटे याच्यासाठी मतदारसंघ मोकळा करून दिला. त्यानंतर संग्राम थोपटे सलग दोनदा (२००९, २०१४) विजयी झाले. मात्र, यंदा त्यांच्यासमोर एकजुटीने ‘युती’चे मोठे आव्हान उभे आहे. तब्बल सहा धरणे व सुपीक प्रदेश भातशेतीचे आगर असलेला हा मतदारसंघ आहे. मात्र, उन्हाळ्यात अनेक गावांत पाणीटंचाई दिसते. रोजगार नसल्याने तरुण वर्ग पुण्या-मुंबईकडे वळला आहे. भोरमध्ये इंडस्ट्रीने फारसा जोर धरला नाही. त्यामुळे ‘विकासा’ची संधी आहे. युतीने नेमके हेच कारण पुढे करत थोपटेंना आव्हान दिले आहे. तरीसुद्धा अनंतराव थोपटेंना मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. काँग्रेसचा खेडोपाडी पसरलेला प्रभाव या मतदारसंघात अजूनही दिसून येतो. थोपटेंनी सहकाराबरोबर शिक्षण संस्थांचा वापर मतदारसंघाच्या बांधणीसाठी प्रभावीपणे केला आहे. त्याचे फळ त्यांना निवडणुकीत मिळते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.शिवसेनेकडून कुलदीप कोंडे यांना उमेदवारी मिळाली असली, तरी इच्छुकांची संख्याही मोठी होती. त्यांच्या नाराजीचा फटका कोंडेंना बसण्याची शक्यता आहे. मुळशीचे बाळासाहेब चांदेरे, आत्माराम कलाटे, भाजपचे किरण दगडे-पाटील, शरद ढमाले यांनीही उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या कांचन कुल यांनाही या मतदारसंघात लक्षणीय मते मिळाली होती, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही........कलाटे यांची बंडखोरी थोपटे यांना फायदेशीर४भोर मतदार संघात मुळशी तालुक्याने नेहमीच थोपटेंना साथ दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत आलेले आत्माराम कलाटे यांना विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. त्यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे त्यामुळे मुळशीतील शिवसेनेची मते कलाटेंना मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा अनायसे संग्राम थोपटे यांनाच होणार आहे. ......२०१४ची निवडणूक संग्राम थोपटे (काँग्रेस) ७८,१६२ मतेकुलदीप कोंडे (शिवसेना) ५९,५४५विक्रम खुटवड (राष्ट्रवादी) ५०,००३शरद ढमाले (भाजप) २४,४०१. .........२०१४ ची निवडणूक संग्राम थोपटे (काँग्रेस) ७८,१६२ मतेकुलदीप कोंडे (शिवसेना) ५९,५४५विक्रम खुटवड (राष्ट्रवादी) ५०,००३शरद ढमाले (भाजप) २४,४०१.
Maharashtra election 2019 : भोरमध्ये काँग्रेस-शिवसेना पुन्हा आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 3:28 PM
२००९, २०१४ साली आमदार संग्राम थोपटे यांनी एकतर्फी नव्हे, पण चुरशीच्या लढतीत विरोधक शिवसेनेवर मात केली होती.
ठळक मुद्देशिवसेनेचे कोंडे दुसऱ्यांदा जनमत अजमावणार; कलाटेंच्या बंडखोरीकडे लक्ष