तळेगाव दाभाडे : राज्यात उद्योगधंदे बंद पडत चाललेत, बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून, शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. स्त्रियांना कसलीच सुरक्षितता नाही. केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी व कामगार विरोधी असून उद्योगपतींना कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी देताना शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. राज्याच्या विकासाचे दावे करणारे राज्य सरकार सत्तेचा नेमका कुणासाठी वापर करत आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी उपस्थित केला. तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत ते शुक्रवारी बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी खासदार नाना नवले, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, चंद्रकांत सातकर, एसआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांचा विचार न करता केवळ मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, अत्याचारात वाढ झाली आहे. शासनाची जेट विमान कंपनी बंद पडली. वीस हजार कामगार बेरोजगार झाले. आघाडी सरकारच्या काळात सुस्थितीत असलेल्या विविध सरकारी कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे बंद पडल्या आहेत, असे पवार म्हणाले.सूत्रसंचालन दत्तात्रय पडवळ आणि सुभाष जाधव यांनी केले. तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी आभार मानले.
एकीकडे मोठी थकबाकी असल्याने अडचणीत आलेल्या बँकेला सरकारी तिजोरीतून ८१ हजार कोटी रुपयांची मदत सरकार देते, तर दुसरीकडे नैसर्गिक संकटांनी अडचणीत आलेल्या शेतकºयांकडून शेतीकर्जाच्या वसुलीसाठी भांडीकुंडी जप्तीचा बडगा सरकार उगारत आहे. कर्जबाजारी शेतकºयांसाठी राज्य सरकार सत्तेचा वापर करत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.