पुणे : निवडणुका, राजकारण हे निवडणुकीच्या कालावधी पुरतेच असते. त्यानंतर हे सर्व काही संपलं पाहिजे. निवडणुकीच्या कालावधीत सुद्धा मुद्द्यांवर बोललं पाहिजे. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात पण वैयक्तिक टीका टिप्पणी ही अतिशय चुकीची बाब असून, धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंबाबत केलेले वक्तव्य निंदनीय आहे. तसेच इतक्या खालच्या पातळीवर केले गेलेले राजकारण महाराष्ट्राच्या सुसंस्कृत माणसाला न आवडणारे आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. मतदान केंद्रावर भेट देत असताना चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले , पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि फडणवीसांच्या सरकारने आतापर्यंतच्या काळात पारदर्शक कारभार देशाला दिला. त्यामुळे यावेळी २२० नाहीत २५० जागा भाजप शिवसेना महायुतीला राज्यात मिळतील. तसेच माझ्या उमेदवारीवर विरोधकांनी खूप चर्चा , आरोप केले. पण त्या गोष्टी आता संपल्या आहेत. पण ज्याचा शेवट गोड त्याचे सर्वच गोड असे म्हणतात. तसेच या निवडणुकीत मला १ लाख ६० हजार मताधिक्य मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. हवा बदलल्याचं फक्त शरद पवारांना दिसते त्यांच्या पाठीमागच्या कुणालाही ते दिसत नाही.
महाराष्ट्र निवडणूक २०१९ : धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 2:28 PM