पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातले शाब्दिक युद्ध निवडणुकीच्या शेवटीही संपले नसून राष्ट्रवादीच्या सांगता सभेतही पवार यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला.
प्रथेप्रमाणे याही निवडणुकीमधील राष्ट्रवादीची सांगता सभा बारामती इथे पार पडली. त्यावेळी पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांनी आम्ही तेल लावून लढण्यास तयार आहोत मात्र समोर पहिलवान नाही असे वक्तव्य केले होते. पवारांनी पुन्हा त्याचा समाचार घेतल्याचे बघायला मिळाले.
ते म्हणाले की, 'आमच्याकडे उरुसाच्या कुस्त्या व्हायच्या. त्यात मोठ्या पहिलवानांना इनाम मिळायचे. मात्र लहान मुलांना कुस्त्यांमध्ये रेवड्या मिळायच्या. त्याचप्रमाणे आम्ही रेवडी पहिलवानांशी कुस्ती खेळत नाही.
यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- आमच्यात दम नसेल तर अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशासाठी फिरत होते
- मी ५२ वर्ष विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभेतून निवडून येत असेल तर काहीतरी काम केलं असेल ना ? ५ वर्षांपूर्वी अमित शहा यांचे नाव तरी माहिती होते का ?
- मी ईडीला येतो, येतो म्हणालो तर ते नका येऊ, नका येऊ म्हणाले. पोलीस प्रमुख येऊन आमचं ठरलंय म्हणाले .
- सत्तेचा गैरवापर करायचा, विरोधकांना तुरुंगात टाकायचे ही भाजपची नीती.