विकास चाटी - जुन्नर विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळी भावनाशीलता हा मुद्दा प्रभावी ठरला होता. तसाच तो यंदाही ठरणार आहे. विकासाचे मुद्दे, कामाचा श्रेयवाद, असंतुष्टांचे समाधान हेही कळीचे मुद्दे ठरणार आहेत. जुन्नरमध्ये गेल्या वेळी शिवसेनेच्या आशा बुचके व मनसेचे शरद सोनवणे यांच्यात सामना रंगला होता. सोनवणे पूर्वीही शिवसेनेत होते. दोन वेळा त्यांना उमेदवारी डावलून बुचके यांना दिल्याने सोनवणेंवर अन्याय होत असल्याची भावना मतदारांमध्ये होती. दशक्रिया विधी, गुणवंतांचे सत्कार असे सामाजिक उपक्रम राबविल्यामुळे जनतेची सहानुभूती मिळून सोनवणे सुमारे १७ हजार मताधिक्याने विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात असलेल्या नाराजीचा फायदाही त्यांना झाला होता. यंदा मात्र त्यांच्याविरोधात जनभावना निर्माण करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतुल बेनके यांना बरेच यश मिळाले आहे. सतत चार वर्षे पुढे असलेले सोनवणे गेल्या काही महिन्यांत प्रभाव कायम ठेवण्यात कमी पडल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी दुष्काळात धरणांचे पाणी नियोजन करण्यात सोनवणे कमी पडल्याची भावना विरोधकांनी शेतकºयांमध्ये निर्माण केली आहे. भरीस भर शिवसेनेच्या रणरागिणी अशी ओळख आशा बुचके यांना शिवसेनेतून काढण्यामागे सोनवणेच जबाबदार असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण करण्यात बुचके यशस्वी ठरत आहेत. सोनवणेंचा सेनेत प्रवेश जुन्या शिवसैनिकांबरोबरच भाजप कार्यकर्त्यांना पटलेला नाही. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सोनवणे यांनी शिवसेनेचे उमेदवार पाडल्याचा राग जुन्या शिवसैनिकांच्या मनात आहे. त्यामुळे शिवसेनेची हक्काची मते सोनवणे यांना किती मिळतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. दीड वर्षापूर्वी चाळकवाडी टोलनाका बंद करण्याच्या आंदोलनात बेनके सोनवणे यांच्यापेक्षा प्रभावी ठरले. सोनवणे यांना विधानसभा अधिवेशन अर्धवट सोडून अचानक टोलनाका बंद करण्यासाठी यावे लागले........पवार व कोल्हे फॅक्टर बेनके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार प्रथमच जुन्नरमध्ये आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. खासदार अमोल कोल्हे यांचा जुन्नर हा मूळ तालुका आहे. कोल्हेंबद्दल तरुणांमध्ये क्रेझ आहे. शिवाजीराव आढळराव जिंकायचे तेव्हा त्यांना तालुक्यातून २० हजारांपर्यंत मताधिक्य मिळत असे. खासदार कोल्हे यांना सुमारे ४१ हजारांचे मताधिक्य मिळाले यातून हे दिसून येते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कोल्हे यांची सभा ठेवली आहे, त्याचा कितपत प्रभाव पडतो हे महत्त्वाचे ठरणार आहे........
Maharashtra Election 2019 : भावनाशील मुद्दे जुन्नरमध्ये प्रभावी ठरणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 3:11 PM