पुणे : महाराष्ट्र राज्य सरकारच्या गड किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचे उदयनराजे भोसले यांनीही गड किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयाची पाठराखण केली असताना पवार यांनी मात्र नाव न घेता टोला लगावला आहे. किल्ल्यावर छमछम करण्याची एवढीच हौस असेल तर चौफुल्याला जा अशा शब्दात पवार यांनी निशाणा साधला आहे. हडपसर येथे महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
छत्रपती उदयनराजे भोसले एका इंग्रजी वृत्तपत्राला गडकिल्ले लग्न समारंभास दिल्यास अर्थव्यवस्था सुधारेल अशी मुलाखत दिली आहे. त्यावर आता पवार यांनी नाव न घेता याच मुद्द्यावर घणाघात केला आहे. या विधानाचा निषेध करताना सांस्कृतिक केंद्रांसाठी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे जिल्ह्यातील चौफुला ठिकाणी जाण्यास सुचवले.
ते म्हणाले की, 'छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि राज्यातील किल्ले लग्न कार्यासाठी द्यायचे हे धोरण चुकीचे आहे. किल्ले हा महाराष्ट्राचा, मराठ्यांचा इतिहास आहे. एवढा बार, छमछममध्ये रस असेल तर चौफुल्याला जा आणि काय करायचे ते करा'.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात सध्या चांगलाच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. फडणवीस यांनी आमचा पहिलवान तेल पहिलवान तेल लावून तयार आहे. पण समोर कुस्ती खेळायला कोणी नाही असा टोला विरोधकांना लगावला होता. त्यावर आता पवार यांनी उत्तर दिलेले बघायला मिळत आहे. पवार यावेळी बोलताना म्हणाले की, आम्ही हवे तिकडे पहिलवान उभे करु हाकतो, कारण महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष मी आहे. सगळे जिल्हे, सगळ्या कुस्ती संघटनांचा अध्यक्ष मी आहे. मी राजकारणाबाहेर खेळाच्या क्षेत्रातही काम केले. मी मुंबई, महाराष्ट्र आणि जगाच्या क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. मला अनेक खेळाडू तयार करण्यात रस आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला पहिलवान वगैरे गोष्टी सांगू नका. आम्ही हवे तितके लोक तयार केलेत असेही ते म्हणाले.
यावेळी पवार यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- राज्य भाजपच्या हातात आहे. राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे. तुमच्याकडे प्रपंच दिला आणि तुम्ही आम्हाला विचारताय आम्ही काय केलं ? फडणवीस साहेब हे वागणं बरं नवं, जरा नीट वागलं पाहिजे. आम्ही काय केलं हे महाराष्ट्राला माहीती आहे.
- भाजपचा दावा आहे की लोक आमच्या बाजूने आहेत. मग देशाचे पंतप्रधान ८ सभा का घेतात, गृहमंत्री राज्यात २० सभा का घेत आहे ? आणि असं असूनही आम्हाला विचारतात काय केल ?
- अमित शहा यांना प्रश्न विचारतो, पाच वर्षांपूर्वी अमित शहा हे नाव कोणाला माहिती होत ? फक्त गुजरातच्या लोकांना माहिती होत.आणि तेच आम्हाला येऊन विचारतात तुम्ही काय केलं.
- शिवछत्रपतींचे स्मारक करतो हे सरकारने जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावलं, जलपूजन केलं आणि पाच वर्षांत वीटही उभारली नाही.
- अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझे नाव घेतल्याशिवाय भाषण करता येत नाही. मोदींचा काही प्रश्न नाही पण दुसऱ्यांनी घेतले तर घरातले पण विचारतील. मात्र त्यांना माझे नाव घेतल्याने शांत झोप लागत असेल तर हरकत नाही.