बारामती : अखेर राज्यात बहुचर्चित आणि लक्षवेधी असणाऱ्या बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविरोधात भाजपच्या वतीने गोपींचंद पडळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे वेटिंगमोडवर असणारे पडळकर आता अॅक्टिव्ह मोडमध्ये आहे. पडळकर उमेदवारी अर्ज शुक्रवारी(दि ४) दुपारी दाखल करणार आहे.
बारामती येथे पडळकर यांनीच पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी माळेगांव कारखान्याचे चेअरमन रंजन तावरे,ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे,जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांच्या उपस्थित होते.भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव न आल्याने अजित पवार यांच्याविरोधात कोण याची उत्सुकता ताणली होती. मात्र, आता ती उत्सुकता संपली आहे.
पडळकर म्हणाले, बारामती मतदारसंघात अनेक मुद्दे आहेत. आमच्या विरोधकांकडे गेली ४० ते ५० वर्ष महाराष्ट्राची सत्ता होती. संपुर्ण महाराष्ट्राने येथील नेत्यांना विश्वास ठेवुन संधी दिली होती. भाजपचा अजेंडा सर्वसामान्य माणुस भयमुक्त असला पाहिजे असा आहे. मात्र, बारामती मतदारसंघात मतदारांना महत्व नाही . मतदान ही अमुल्य प्रक्रिया आहे. याठिकाणी पुढाऱ्यांनी पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांसाठी चालविलेली लोकशाही असल्याचे चित्र आहे. ते आम्हाला मोडीत काढायचे आहे. येथील मतदारांना मताची किंमत समजु दिली नाही . यामध्ये बदल करण्यासाठी बारामतीच्या लोकांसमोर जाणार असल्याचे पडळकर म्हणाले.
पडळकर यांनी सांगितले की, धनगर समाजाला आरक्षण मिळावे,या हेतुने भाजपमधुन बाहेर पडलो .यामध्ये माझा कोणताही हेतु नाही..मला आमदारकी,खासदारकी मिळावी,म्हणुन भाजप सोडले नाही. मुलगा रडल्याशिवाय आई दुध पाजत नाही.या भावनेतुन भाजप विरोधात राज्यभर आंदोलन केले. राज्यभर ३० ते ३५ मेळावे घेतले. १६ नोव्हेंबर २०१८ ला बिरोबाच्या प्रांगणात राज्यातील समाजाचा मोठा मेळावा घेतला. ८ ते १० लाख लोक उपस्थित होते.समाजाला आरक्षण मिळावे,यासाठी सरकारवर मोठा दबाव आणला. विरोबाची शपथ सरकारने आमचा प्रश्न सोडवावा यासाठी घातली होती.मला वैयक्तिक काही मिळावे,यासाठी घातलेली नव्हती. भाजपशिवाय धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कोणताही पक्ष सकारात्मक आहे, असे मला वाटत नाही. आमच्याशी कोणी पाच मिनिटे बोलायला तयार नव्हते. आम्हाला १ हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. आदिवासींच्या २२ योजना लागु केल्या आहेत. अहिल्यादेवींचे विद्यापीठाला नाव दिले.त्यामुळे आमच्या उर्वरीत मागण्या पुर्ण होतील,अशी आमची भावना असल्याचे पडळकर म्हणाले.—————————————————