पुणे: पुण्यातील राज ठाकरे यांच्या सभेत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. संध्याकाळी 6 च्या सुमारास आलेल्या पावसामुळे संपूर्ण मैदानावर चिखल झाला, अजूनही जोरदार पाऊस सुरू असून राज ठाकरे यांची सभा रद्द होण्याची शक्यता आहे.
राज्यभरातील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पुण्यातील राज ठाकरे यांची सभा सुरू होण्यापूर्वीच पावसाने तुफान हजेरी लावली. सकाळी पडलेल्या पावसाने मैदानावर चिखल झाल्याने तसेच पाणी साठल्याने कार्यकर्त्यांनी मैदान भुसा, खडी व मोठमोठे फ्लेक्स टाकून व्यवस्थित करून घेतले होते. परंतु, संध्याकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मात्र दाणादाण उडविली. त्यामुळे राज ठाकरे यांची सभेवर अनिश्चीततेचे ढग पसरले आहेत.
कसबा मतदार संघाचे उमेदवार अजय शिंदे यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांची सभा सरस्वती मंदिर हायस्कुलच्या मैदानावर (नातू बाग) आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी सुरुवातीला शहरात कोणतीही शाळा मैदान द्यायला तयार नव्हती. याबाबत मनसेने पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन अलका टॉकीज चौकात सभा घेण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर सरस्वती मंदिर शाळेने मैदान देऊ केले.
सभेसाठी शहर मनसेने जोरदार तयारी केली होती. परंतु, सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याने सभास्थानावर प्रचंड चिखल झाला होता. तसेच ठिकठिकाणी पाणी साठले होते. परंतु कार्यकर्त्यांनी याठिकाणी भुसा, खडी आणि मोठाले फ्लेक्स टाकून मैदान तयार ठेवले होते. परंतु, सहाच्या सुमारास तुफान पावसाला सुरुवात झाली. मैदानावरील झाडांच्या फांद्याही तुटून पडल्या. कार्यकर्त्यांनी बसायच्या खुर्च्या सुरुवातीला डोक्यावर घेऊन पावसापासून बचावाचा प्रयत्न केला. परंतु, पावसाचा जोर वाढताच कार्यकर्ते मैदानातून बाहेर जाऊन बचावासाठी प्रयत्न करू लागले. परंतु काही उत्साही कार्यकर्ते मैदानात थांबून पावसात नाचत होते. मैदानाची पावसामुळे दाणादाण उडाली असल्याने या परिस्थितीत ठाकरे यांची सभा होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.