Maharashtra election 2019 :मी राजीनाम्याची नौटंकी करणारा नेता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:31 AM2019-10-19T11:31:55+5:302019-10-19T11:35:15+5:30
त्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदारकीचा राजीनामा का दिला याबाबत विचारण्यात आले. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी त्यात कोणतेही राजकारण नसल्याचे सांगितले.
पुणे : मी वेळ बघून काहीही करत नाही. माझा राजीनामा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिलेला नव्हता.नौटंकी करणारा नेता मी नाही असे सांगत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्या राजीनाम्याचे स्पष्टीकरण दिले.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदारकीचा राजीनामा का दिला याबाबत विचारण्यात आले. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी त्यात कोणतेही राजकारण नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ''मी वेळ, मुहूर्त बघून राजीनामा दिला नाही.मी नौटंकी करणारा नेता नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीही करत नाही'.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मी वापरलेला 'चंपा' हा शब्द माझा नसून भाजपच्याच एका कॅबिनेट मंत्र्यांचा आहे असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. मी एका भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याकडे गेलो होतो. त्यांनी त्यावेळी बोलताना चंपा माझं ऐकतील असं वाटतं नाही असं वाक्य वापरलं.त्यामुळे ती व्यक्ती कोण आहे ही मी चंद्रकांतदादांना भेटून सांगेन. मात्र आम्ही नाही तर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे मंत्री असं म्हणतात, हा आमचा शब्द नाही. अजित पवार यांनी पिंपरी येथील सभेत चंपा शब्द वापरल्यावर राज ठाकरे यांनीही पुण्यात वापरला होता. त्यावरून पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या सभेत प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे हा वाद वाढलेला दिसून आला. आता मात्र पवार यांनी भाजपच्याच मंत्र्याकडे बोट दाखवले आहे.
यावेळी पवार यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- भाजपने कितीही आव आणला तरी नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजप आहे, नितीन गडकरीही फारसे प्रचारात दिसले नाहीत. त्यामुळे फक्त शरद पवार यांनी सभा घेतल्या असे म्हणून चालणार नाही. जाणून बुजून तरुणांना प्रचारात पुढे आणण्यात आले.
- मी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजीनामा दिला नाही, मी नौटंकी करणारा नेता नाही, वेळ बघून काहीही करत नाही.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचा अभिमान असे साताऱ्याच्या सभेचे वर्णन.
- अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु असल्यामुळे प्रचारावर परिणाम, बहुतेक उमेदवारांची शेवटची प्रचार सभा असते त्यात आरोपांना उत्तर दिले जाते. मात्र आज उद्या पावसाचा अंदाज असल्याने काहीसा हिरमोड.
- तिकीट वाटपात उशीर झाल्याने काँग्रेस राष्ट्रवादीची एकत्रित सभा होऊ शकली नाही.
- पंतप्रधान प्रचारासाठी आल्यामुळे आम्हाला आमच्या सभा रद्द कराव्या लागल्या, हेलिकॉप्टर उडू दिले नाही.