पुणे : मतदानाला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असताना उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरु आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर देखील शेलकी विशेषणे, उपरोधिक वक्तव्ये, राजकीय नेत्यांची गंमतीशीर छायाचित्रे प्रसिध्द होत आहेत. मात्र कार्यकर्त्यांकडून हे फोटो प्रसिध्द करताना कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वाद होत असून बदनामीकारक मेसेजला उत्तर देण्याकरिता आय टी सेल कार्यरत झाले आहेत. विधानसभेच्या निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. आरोप प्रत्यारोप समाजमाध्यमातून होत असून उमेदवार किंवा पक्ष नेत्यांची खिल्ली उडवण्यासाठी बदनामीकारक मजकूर सोशल मिडीयावर प्रसिद्ध केला जात आहे. यासाठी अनेक पक्षांसह उमेदवारांचे आयटी सेल कार्यरत आहेत. तसेच पक्षांचे कार्यकतेर्ही ऑनलाईन एक्टीव्ह आहेत. यातून राजकीय नेत्यांचे चरित्रहनन केले जात असल्याची तक्रार सामाजीक कार्यकर्ते सचिन शिंगवी यांनी सायबर क्राईम सेलकडे केली आहे. यामध्ये नेत्यांची छायाचित्र, व्हिडीओ एडीट करुन विविध पोस्ट प्रसारीत केल्या जात आहेत. अशा प्रकारेच राजकारण महाराष्ट्राचे या ग्रुपवर पोस्ट टाकून काही राजकीय नेत्यांची बदनामी करण्यात आली. शिंगवी यांनी केलेल्या तक्रारीत राजकारण महाराष्ट्राचे या पेजवर त्यांना जॉईंन होण्यासंदर्भात रिक्वेस्ट आली होती. त्यांनी ती स्वीकारली. त्यानंतर धनाजी वाकडे या फेक नावाने अकाऊंट असलेल्या व्यक्तीने शरद पवार, सोनिया गांधी आणी राज ठाकरे यांची छायाचित्रे एडिट करुन बदनामिकारक पोस्ट टाकल्या आहेत. या पोस्टमुळे आपल्या भावना दुखावल्या असल्याने तक्रार केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Maharashtra election 2019 : एडिटिंगद्वारे नेत्यांची उडवली खिल्ली ; सायबर सेलकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 5:43 PM