पुणे : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टी समजत नाहीत, अशी टीका रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी बॅनर्जी यांच्याबाबत बोलताना केली. ‘नोबेल विजेते भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांचे अभिनंदन, मात्र ते डाव्या विचारसरणीचे आहेत व त्यांचा तो विचार भारताने नाकारलेला आहे, त्या विचारांना भारतात थारा नाही असेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पुण्यात आलेल्या गोयल यांनी शुक्रवारी (ता. १८) माध्यम प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांच्याबद्धल बोलताना ते म्हणाले, बॅनर्जी यांचे नोबेल पुरस्काराबद्धल अभिनंदन. मात्र ते कोणत्या विचारांचे आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. ते डाव्या विचारांचे आहेत. काँग्रेसने गरिबांसाठी आणलेल्या न्याय योजनेला त्यांनी पाठिंबा दिला होता. त्यांच्या विचारांना भारताने नाकारले आहे.
मनमोहनसिंग यांच्यावरही गोयल यांनी टीका केली. त्यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टीही माहिती नाहीत असेच दिसते. त्यांच्याच काळात अनेक घोटाळे झाले. नेतृत्वाच्या भीतीने त्यांनी त्यावर निर्णय घेतले नाहीत. एकदोन नव्हे तर कोट्यवधी रूपयांचे घोटाळे झाले तरीही त्यांनी काही केले नाही. त्यांनी देशाला लाचारीच्या अवस्थेत सोडले होते. आम्ही गेल्या ५ वर्षात देशाला समर्थ केले, मात्र तेही त्यांना समजत नाही याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या काळात व्याजदर कमी होता. त्यात आम्ही वाढ केली. देशहित सोडून ते पक्षहित पहात होते, त्यामुळे उद्योग तसेच अर्थव्यवस्थेचेही हानी झाली होती. भारतीय रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. त्याचे कधीही खासगीकरण केले जाणार नाही. याबाबतच्या बातम्या निराधार आहेत. त्यांच्या काळात रेल्वेची वाढ झाली नाही. आम्ही ती केली. गुंतवणूक वाढवली. अर्थव्यवस्थाही आम्ही सुदृढ करणारच. जागतिक परिस्थितीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही. ५ ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेतील १ ट्रिलियन महाराष्ट्राचे असतील असे गोयल म्हणाले. गुरूवारी पुण्यात झालेल्या मोदी यांच्या सभेचाही त्यांनी उल्लेख केला व राज्यात युतीचेच सरकार परत येईल असा विश्वास व्यक्त केला. खासदार गिरीश बापट, भाजपाचे शहर सरचिटणीस गणेश बीडकर, उज्वल केसकर यावेळी उपस्थित होते.