- अतुल चिंचली
पुणे : देशाच्या स्वातंत्र्यनंतर पहिली लोकसभा निवडणूक १९५२ साली झाली. तेव्हापासून आतापर्यंत मला लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका, तिन्ही निवडणुकीत मतदान करत आले आहे, अशा भावना ९९ वर्षांच्या सोपानराव कालेकरांनी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. सोपान कालेकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील अंदोरी गावात १९ ऑगस्ट १९२१ साली झाला. आता ते बुधवार पेठेतील, विजय मारुती चौकातील मोघल मार्केटसमोर वास्तव्यास आहेत. सोपानराव बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजजवळ वृत्तपत्रे विकणे, गाडीवरून मीठ विकणे, खडी पाडायला असे लहान लहान व्यवसाय करत असे. आता ते कापड व्यापारी आहेत.
कालेकर म्हणाले, पहिल्या लोकसभेला आपल्या भागातून काकासाहेब गाडगीळ हे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. तो काळ काँग्रेसचा असला तरी कम्युनिस्ट, सोशलिस्ट समाजवादी, जनसंघ आणि हिंदू महासभा असे पक्ष होते. तर केशवराव जेधे, शंकरराव मोरे, नानासाहेब गोरे, श्रीपाद डांगे सारखी राजकीय मंडळी होती.
पूर्वीपासून आपल्याकडे उमेदवार बघूनच मतदान केले जात होते. ती परंपरा अजूनही टिकून राहिली आहे. १९५२ नंतर संपूर्ण भारतात इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा नेत्यांचा काळ सुरू झाला. पण त्याच काळात जनसंघ, हिंदू महासभा यासारखे पक्ष वर येऊ लागले होते.निवडणुकीच्या काळात लक्ष्मी रस्त्याने नेहरूंची रॅली चालली होती. ते पाहण्यासाठी लोकांमध्ये निवडणुकीचा उत्साह दिसून येत होता. पूर्वी वाहनांचे प्रमाण कमी होते. अशा वेळी सर्वच राजकीय नेते मोठमोठ्या रॅली काढत असे. सुरुवातीचा काळ काँग्रेसचा काळ होता. त्यामुळे उमेदवार बघितला जात नव्हता. आता मात्र सामान्य नागरिक हुशार झाले आहेत. सद्यस्थितीत उमेदवाराचे शिक्षणही बघितले जाते. राजकारणात कितीही बदल झाला तरी उमेदवार निवडून देणे आपल्या हातात असते.
दीर्घायुष्याचे रहस्य उलघडताना कालेकर म्हणाले की, आजकालच्या सुरळीत रस्त्यावरून सायकलवर प्रवास करणे अवघड झाले आहे. पण तेव्हा असणाऱ्या चिंचोळ्या आणि खडबडीत रस्त्यावरून आम्ही सायकल चालवत होतो. तर मोठी अगरबत्ती लावून ती संपेपर्यंत जोर, बैठक मारत असे.शरीर निरोगी राहण्याचे हेच एकमेव कारण आहे.
देशच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान कराआधुनिक जगात भारताला तरुणांचा देश म्हणून ओळखले जाते. पण सध्याचे तरुण प्रचारफेरी, उमेदवारांची रॅलमध्ये फिरताना दिसतात. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मतदान करावे, असे त्यांनी आवाहन केले.- सोपानराव कालेकर