यवत :- शेतकऱ्यांच्या मालकीचा भीमा सहकारी साखर कारखाना बंद पाडून खासगी मालकीचा होऊ दिला नाही म्हणून आमदार राहुल कुल यांना अडचणीत आणणाऱ्या मंडळींना सर्वोतोपरी सहकार्य रमेश थोरात यांनी केले. त्यामुळे भीमा पाटसवर बोलायची त्यांची लायकीच नाही अशी जोरदार टीका भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक सुरेश शेळके यांनी केली आहे. विधानसभेच्या प्रचारात भीमा पाटस कारखान्याच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीकडून जोरदार टीका केली जात असल्याने कारखान्यात मागील अनेक वर्षात संचालक म्हणून काम केलेले आणि कुल घराण्याचे निष्ठावान कार्यकर्ते सुरेश शेळके यांनी राष्ट्रवादी आणि रमेश थोरात यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. सुरेश शेळके यांनी यवत येथे पत्रकारांशी संवाद साधत थोरात यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले. ज्या थोरात यांना भीमा पाटस कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी घरी बसविले, त्यांच्या भागातून निवडून जाणारा मी संचालक आहे.आमच्यात थेट लढत त्या निवडणुकीत झाली होती.आता रमेश थोरात यांना कारखान्याची निवडणूक लढविण्याची तल्लफ देखील होत नाही. शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेला भीमा पाटस कसा बंद पडेल यासाठी कायम प्रयत्नशील असणारे रमेश थोरात.. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय लाभ घेण्यासाठी भीमा पाटस कारखान्याचा कळवळा आल्याचा आव आणतात. मात्र यांना यांची जागा सभासदांनी दाखविलेली असल्याने त्यांनी आता तालुक्याच्या विकास कामांवर बोलावे असे आवाहन शेळके यांनी केले. भीमा पाटस कारखाण्यावर कर्जाचा डोंगर झाल्याचे सांगणारे रमेश थोरात यांचे आयुष्य लाचारी करण्यात गेले आहे. आमदार राहुल कुल यांनी स्वाभिमानीपणा जपत अडचणीत असला तरी भीमा पाटस कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच ठेवला आहे.त्यात त्यांचा स्वार्थ काय ? दौंड तालुक्यात कधी नव्हता मिळाला एवढा विकास निधी मागील पाच वर्षात आला आहे.अनेकांना वैयक्तिक शासकीय योजनांचा थेट लाभ राहुल कुल यांच्या माध्यमातून मिळाला.मात्र, जनतेची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी पटाईत असलेल्या लबाड प्रवृत्तीच्या मंडळींना तालुक्यातील सुज्ञ जनता जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असेही सुरेश शेळके यांनी सांगितले.
.................दौंड तालुका तांबोळी समाजाच्या वतीने राहुल कुल यांना जाहीर पाठींबा पुणे जिल्हा युवक काँग्रेस पक्षाचे मा.जिल्हा सरचिटणीस व अंजुमन इत्तेहाद दौंड तालुका तांबोळी समाज संघटनेचे तालुका अध्यख मोहसीन तांबोळी यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला असून दौंड तालुका तांबोळी समाज यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांना जाहीर पाठींबा दिला आहे.तांबोळी समाज संघटना मुस्लिम समाजातील इतर मागास वर्गात येणाऱ्या नागरिकांसाठी काम करते.कुल यांनी आमदार असताना मुस्लिम समाजासाठी अनेक विकास कामे केल्याने त्यांना जाहीर पाठींबा देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.