पुणे - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी दिलेला आमदारकीचा राजीनामा चांगलाच गाजलेला पाहायला मिळाला. तसेच अजित पवारांनी मुलांना राजकारणात न येता शेती उद्योग करावा असा सल्ला दिला असल्याचं शरद पवार यांनी सांगितले होते. वडिलांचा हा सल्ला अजित पवार यांचे छोटे चिरंजीव जय पवारने मनावर घेतला आहे. मी राजकारण आलो तरी कोणतीही निवडणूक लढविणार नाही अशी माहिती त्यांनी टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
बारामती येथून अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी जय पवारने सध्या आघाडी घेतली आहे. पार्थ पवार मावळ मधून निवडणूक लढवित असतानाही पडद्यामागून जय पवार यांनी सोशल मीडियातून प्रचाराची भूमिका सांभाळली होती. त्यानंतर पुन्हा एकदा जय पवार हे अजित पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीत पदयात्रा काढली आहे.
यावेळी माध्यमाशी बोलताना जय पवार म्हणाले की, अनेकदा माझ्या राजकारणाच्या प्रवेशाची चर्चा सुरु असते. जरी मी राजकारणात उतरलो तरी पक्षाचं कोणतं तरी पद घेऊन सामान्य माणसांसाठी काम करेन पण मी कोणतीही निवडणूक लढविणार नाही अशी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. तसेच पवार कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप जय पवारने केला.
जय पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे पवार घराण्यातील जयने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिकेवर पाऊल ठेवल्याचं बोललं जात आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभेतून निवडणूक लढविली होती. मात्र शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला. तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचे नातू रोहित पवार हेदेखील कर्जत-जामखेड या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपाचे राम शिंदे यांच्याविरोधात रोहित पवार निवडणूक लढवित आहे. त्यामुळे पवार घराण्यातील जय पवारने मात्र निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.