Maharashtra Election 2019 : पुण्यातील लोकांनी लावली मुंडे कुटुंबात भांडणे : पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 12:24 PM2019-10-14T12:24:18+5:302019-10-14T12:24:47+5:30
२४ ऑक्टोबरला राष्ट्रवादीचे घड्याळ कायमस्वरुपी बंद पडेल
पुणे : मुंडेसाहेबांचे पुण्याशी, येथील अनेक कुटुंबांशी, मिसाळ परिवारासोबत घरगुती स्वरुपाचे नाते होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी ही नाती, त्यांचा वसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु याच पुण्यातील काही लोकांनी आमच्या कुटुंबात भांडणे लावून दिली. स्वत:च्या जिल्ह्यात बारामती, आंबेगाव वगळता एकही जागा जिंकता आली नसताना बीडची धास्ती कशासाठी घेता, असा उपरोधिक टोला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी शरद पवार, अजित पवार यांना लगावला. तसेच येत्या २४ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांनी कायमस्वरुपी बंद पडेल, असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी येथे व्यक्त केला.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांनी रविवारी (दि. १३) सहकारनगर येथील वाळवेकर लॉन्स येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. सभेसाठी पर्वतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, युवानेत्या स्वरदा बापट, शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओस्तवाल, महेश लडकत, स्मिता वस्ते, राजेंद्र शिळीमकर, प्रवीण चोरबेले, दिसा माने, महेश वाबळे उपस्थित होते.
पंकजा मुंडे म्हणाल्या, की पुण्यात इतकी वर्षे सत्ता असताना काँगे्रस- राष्ट्रवादी काँगे्रसने विकास का केला नाही. परंतु भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेवर आल्यानंतर मेट्रो, स्मार्ट सिटीसारखे विकासाचे अनेक प्रकल्प हाती घेतले. राज्यात मुंबईनंतर सर्वात मोठे व महत्त्वाचे शहर असलेल्या पुण्याच्या विकासाला गती देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. भारतीय जनता पार्टीने नेहमीच विकासाच्या मुद्द्यांना महत्त्व दिले. पक्षाचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘सबका साथ, सबका विकास’ आम्ही सर्व कार्यकर्ते स्थानिक पातळीवर काम करत आहोत. यामुळेच पुण्यात आणि राज्यात भारतीय जनता पक्षांच्या उमेदवारांना नागरिक प्रचंड मतांनी निवडून देतील आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे घड्याळ कायमस्वरुपी बंद पाडतील, असा विश्वास मुंडे यांनी येथे व्यक्त केला.
मिसाळ म्हणाल्या, की मुंडेसाहेबांमुळे मी राजकारणात आले. महापालिका असो की आमदारकीची निवडणूक मुंडेसाहेबांच्या आदेशामुळे आणि विश्वासामुळे लढवली आणि निवडूनदेखील आले. जेव्हा जेव्हा शक्य झाले तेव्हा साहेबांनी माझ्यासाठी एक तरी सभा घेतली. तसेच प्रत्येक निवडणूक साहेब दररोज फोन करून प्रचार कसा सुरू आहे, काही अडचण नाही ना याची चौकशी करत.
...........
मैत्रिणीसाठी खास सभा : साहेबांनंतरही हे नाते अतूट..
मुंडेसाहेबांचे बाबा मिसाळ, सतीश मिसाळ यांच्यासोबत मैत्रीपूर्ण व घरगुती स्वरुपाचे नाते होते. साहेबांनंतर हे नाते आम्हीदेखील पुढे नेले आहे.
४माधुरीताई आणि माझ्या वयामध्ये अंतर असले तरी आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत. साहेब माधुरीताईसाठी एक तरी सभा घेत आणि म्हणूनच मीदेखील केवळ माझ्या मैत्रिणीसाठी ही खास सभा घेतली.
४माधुरीताई पक्षाच्या अध्यक्षा झाल्यानंतर आमदारकीच्या तिकिटाबाबत अनेक अफवा उठल्या होत्या. परंतु त्यांची मैत्रीण पक्षाच्या कोर कमिटीमध्ये असल्यावर कोण तिकीट कापणार, असेदेखील पंकजा मुंडे यांनी
येथे सांगितले.