पुणे : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले असून ठाकरे यांनी माझे अश्रू सांगण्यापेक्षा युती कशी टिकेल हे उद्धव ठाकरे यांनी पाहावं अशी बोचरी टीका केली आहे.
मंगळवारी झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यावेळी ते म्हणाले होते की, “अजित पवारांच्या डोळ्यात पाणी आलेलं महाराष्ट्रानं पाहिलं. ते पाणी पाहून मला मगरीचे अश्रूच आठवले. तुमच्याकडे जेव्हा माझा शेतकरी पाणी मागायला आला तेव्हा तुम्ही त्याला उदाहरण काय दिलं? आठवा. काय बोलला होतात ते विसरु नका.” आता त्यावर पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना उत्तर दिले आहे.
पवार म्हणाले की, ' 5 वर्ष शिवसेना सरकारमध्ये होती. त्यांनी फक्त पोकळ आश्वासन दिली. राज्यात बेरोजगारी ,शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, त्याच उत्तर त्यांनी द्यावे. पीक विमा का मिळाले नाहीत असा सवालही त्यांनी विचारला. मी कसा आहे ते लोकांना माहिती आहे. माझे अश्रू मगरीचे आहेत की कशाचे हे तपासायचं काम उध्दव ठाकरे कधीपासून करायला लागले असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- शिवसेना पाच वर्ष झोपली होती का ? आता दहा रूपयांत जेवण आणि कर्जमाफीच्या घोषणा करताय इतके दिवस सत्तेत असताना झोपले होते का ?
- ही देशाची निवडणूक नाही. राज्याची निवडणूक आहे. 370 चा मुद्दा आता राज्यात नाही.
- हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे मी कायम सांगतोय. आता कांद्याला पैसे मिळायला लागले तर लगेच निर्यात बंदी केली.
- भाजपच्या विरोधात मतविभाजनाचा फटका बसू नये म्हणून कोथरूडमध्ये मनसेला पाठिंबा.