पुणे : यंदाच्या विधानसभा निवडणूकीत पुण्याच्या आठही मतदारसंघातून शिवसेनेला एकही तिकीट न देण्यात आल्याने कार्यक र्त्यांमधील नाराजी, दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे काम निष्ठेने करुन तिकिट देण्याच्या वेळेस पक्षश्रेष्ठींकडून डावलण्यात आल्याची भावना यामुळे भाजप, शिवसेना आणि कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बंडखोरीचे निशाण फडकवले आहे. कॉग्रेसच्या सदानंद शेट्टी, भाजपकडून डॉ.भरत वैरागे आणि शिवसेनेकडून पल्लवी जावळे यांनी शुक्रवारी (दि. ४) उमेदवारी अर्ज भरुन पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना धक्का दिला. अर्थात हे बंड शेवटपर्यंत टिकणार हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल. सध्या कँन्टोंमेंट मतदारसंघातून भाजपने सुनील कांबळे आणि कॉग्रेसने रमेश बागवे यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारांना भाजपकडून डॉ. भरत वैरागे आणि सदानंद शेट्टी यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेच्या पल्लवी जावळे यांनी देखील बंडखोरी करुन अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. कांबळे विरुध्द बागवे अशा थेट लढतीची अपेक्षा असताना बंडखोरांनी निवडणूक चुरशीची केली आहे. प्रमुख पक्षातील उमेदवारांविरोधात असलेले नाराजीचे वातावरण, आणि पक्षांतर्गत वाद यामुळे संघषार्ची ठिणगी पडली आहे. म्हणून अनेक उमेदवारांनी अर्ज भरुन आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या सोमवारी दुपारी तीननंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
* पुण्यातील आठही मतदारसंघात शिवसेनेचा एकही उमेदवार नाही. पुणे क न्टोंमेंट मतदारसंघातून शिवसेनेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. अशावेळी त्यांना प्रत्युत्तर देण्याकरिता निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात हा निर्णय मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी बोलुन घेतला आहे. - पल्लवी जावळे, नगरसेविका, पुणे कँन्टोंमेंट
* पक्षाकडे आतापर्यंत तीनवेळा उमेदवारी मागितली. दरवेळी त्यांनी डावलले. मागच्या विधानसभेच्या वेळी बागवे हे मंत्री होते. म्हणून मला माघार घेण्यास सांगितले. यावेळी ते पक्षाचे शहराध्यक्ष आहेत, याकरिता माझी उमेदवारी नाकारली. माझ्याकडून काय चुक झाली? हे पक्षाने सांगितल्यास बरे होईल. - सदानंद शेट्टी, कॉग्रेसचे माजी नगरसेवक
* पक्षाची नेमकी भूमिका काय आहे हे कळायला हवे. उमेदवार जाहीर करण्यापूर्वी पक्षाने सर्वे घेतला. त्यात माझे नाव असताना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आली. मतदारसंघातून 22 जणांनी मुलाखती दिल्या. प्रत्यक्षात तिकीट वेगळ्याच उमेदवाराला दिले. मग मुलाखतीचा फार्स कशासाठी होता? - डॉ. भरत वैरागे, अध्यक्ष - भाजप अनुसुचित जाती मोर्चा, माजी नगरसेवक