Maharashtra Election 2019 : शरद पवार म्हणाले खडसे संपर्कात; पण अजितदादा तर वेगळंच सांगताहेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 13:25 IST2019-10-04T13:25:11+5:302019-10-04T13:25:59+5:30
खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी गुरुवारी नवी मुंबईत केला होता.

Maharashtra Election 2019 : शरद पवार म्हणाले खडसे संपर्कात; पण अजितदादा तर वेगळंच सांगताहेत!
पुणे- भाजपाचे मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी गुरुवारी नवी मुंबईत केला होता. तर अजित पवारांनी खडसे कोणाच्याही संपर्कात नव्हते, माझ्या आणि जयंत पाटील यांच्याही नाही, असं सांगितलं. त्यामुळे पवार काका-पुतण्यांच्या विधानांमध्येच विसंगती असल्याचं समोर आलं आहे.
अजित पवार म्हणाले की, भाजपने कोणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांचा आहे. राजकीय कार्यकर्ता म्हणून मीही बुचकळ्यात पडलो, विनोद तावडे, प्रकाश मेहता असतील किंवा खडसे, बावनकुळे यांना उमेदवारी नाकारतील, असं मलाही वाटलं नव्हतं. खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हते, मी काल सकाळपासून मुंबईतल्या राष्ट्रवादी भवनमध्ये बसलो होतो. त्यावेळी मीच काही चॅनलवर पाहिलं की अजित पवार हेलिकॉप्टरमध्ये बसले. अजित पवारांचं हेलिकॉप्टर आता जळगावला रवाना झालंय. अजित पवारांनी बीडचा हेलिकॉप्टरचा दौरा रद्द केला नि जळगावचा दौरा सुरू केला, पण असं काहीही झालेलं नव्हतं.
तर दुसरीकडे काल शरद पवार म्हणाले होते की, भाजपच्या नेत्यांच्या मनातील ही खदखद आजची नसून अनेक महिन्यांची आहे. तेव्हापासून हे सर्व नेते आमच्या संपर्कात असल्याची पुस्ती पवार यांनी जोडली. त्यांच्याबाबत योग्यवेळी निर्णय घेऊ.भाजपमध्ये योग्य सन्मान मिळणार नाही, हे माहीत असतानाही गणेश नाईक भाजपमध्ये गेले. त्यामुळे त्यांना आता अपमान भोगावाच लागेल, असा टोला पवार यांनी लगावला होता.