- सुकृत करंदीकरपुणे : यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीपुढे आव्हान कोणाचेच नाही. पण जनताच शरद पवार यांचे राजकारण संपवणार आहे, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संपला असून, त्यांना अनेक ठिकाणी उमेदवारही देता आलेले नाहीत. मनसेला कॉंग्रेस आघाडीमध्ये घेण्याबाबत दुमत होते, त्यांना पाठिंबा देण्याची हतबलता त्यांच्यावर आली आहे, असेही ते म्हणाले.शरद पवार याही वयात फिरत असल्याने त्यांना सहानुभूती मिळणार नाही. उलट ‘या वयात पवार कशाला फिरतात? थापेबाजीचे राजकारण, जातीय राजकारण ते आणखी किती वर्षे करणार, असे आता लोकच विचारू लागले आहेत, असे पाटील म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नेते अनेक आहेत. पण कार्यकर्ता एकच आहे ते म्हणजे स्वत: शरद पवार. तेच आता प्रचारात दिसत आहेत. त्यामुळे प्रचारात त्यांचा उल्लेख होतो, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरलेले पाटील कोथरुड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.सर्वसाधारणपणे १ कोटी ७० लाख मते मिळवणाऱ्या पक्षाची राज्यात सत्ता येते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना आणि घटकपक्षांच्या महायुतीला राज्यात २ कोटी ७४ लाख मते मिळाली होती. २८८ पैकी २२७ मतदारसंघांमध्ये ‘महायुती’ला मताधिक्य होते. लोकसभेतल्या मतांची टक्केवारी पाहता राज्यात महायुतीचे अडीचशे आमदार निवडून येतील. तरीही आम्ही किमान २२० जागा जिंकू असे बोलतो. उरलेल्या ६८ जागांमध्ये दोन्ही कॉंग्रेस, अपक्ष आणि इतर पक्ष राहतील,’’ असे पाटील म्हणाले. निकालानंतर विरोधी पक्षनेतेपदही कदाचित कोणाला मिळणार नाही, असाही दावा त्यांनी केला.शिवसेनेसह कोणतेही मित्रपक्ष भाजपावर नाराज नसल्याचा दावा पाटील यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘एकट्या भाजपचे दीडशे आमदार निवडून आले तरी येणारे सरकार हे ‘महायुती’चेच असेल. सर्व घटकपक्षांना त्यात स्थान असेल. भाजपाचे हे धोरण ठरलेले आहे. आमच्यातल्या कोणाला किती जागा मिळतील हे महत्त्वाचे नाही. महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यावर आमचा भर आहे.’ काही ठिकाणी बंडखोरी झाली. मात्र पक्ष जिवंत असल्याचे हे लक्षण आहे. आमच्या कार्यकर्त्यांना समजावण्यात आम्ही यशस्वी झालो असून, त्याचा परिणाम निकालावर होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शरद पवारांचा राग का?‘खरे म्हणजे शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रीय नव्हती. महाराष्ट्रीयही नव्हती. खºया अर्थाने ती पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष होता. मात्र, गेल्या पाच वर्षांत पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यातूनही त्यांना आम्ही हद्दपार करत आणले आहे. पक्षाने जबाबदारी दिल्याने मी यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. पवारांच्या बालेकिल्ल्यालाच हादरे दिल्यामुळे शरद पवार मला टार्गेट करतात,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले. समोरच्याला किरकोळीत काढायचं, जातीयवादी बोलायचं हे पवारांचे राजकारण लोकांनीही आता ओळखले आहे. त्यामुळे त्यांच्या निराशेत वाढ झाली आहे, अशीही टिप्पणी पाटील यांनी केली.उदयनराजेंना कसली भीती दाखवणार? : इतर पक्षांमधून मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले ही वस्तुस्थिती आहे. मात्र, कशाच्या तरी दबाव-दहशतीमुळे हे घडल्याचा आरोप साफ खोटा आहे असे सांगून ते म्हणाले, की उदयनराजे-शिवेंद्रराजे, राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक यासारख्या नेत्यांना कोण कसली भीती दाखवणार? उलट कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधून बाहेर पडलेले सगळे नेते हुशार आणि दूरदृष्टी असलेले आहेत. दोन्ही कॉंग्रेसना भवितव्य नाही, हे त्यांनी ओळखले आहे. आपापल्या भागाच्या विकासासाठी ते आमच्याकडे आले आहेत.’१९८२ पासून मी पुण्याचा आहे. मंत्री म्हणून गेली पाच वर्षे पुण्याच्या प्रश्नांशी निगडीत आहे. त्याही आधी बारा वर्षे मी पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व केले. तेव्हा याच पुण्यातल्या तीन लाख मतदारांनी मला दोनदा निवडून दिले. त्यामुळे मी ‘बाहेरचा’ असल्याची चर्चा कोथरूडच्या मतदारांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये नाही. - चंद्रकांत पाटील