दुर्गेश मोरे-
पुणे जिल्ह्यातील शिरूर-हवेली मतदारसंघावर कोणत्याच पक्षाला जास्त काळ पकड ठेवत आली नाही़ विधानसभा निवडणुकीत प्रत्येक वेळेस मतदारांनी बदल घडविला आहे़. यंदा दुरंगी लढत दिसून येत आहे़ वास्तविक पाहता सहकार क्षेत्र, मूलभूत सुविधा, शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्याचबरोबर परिसरात बेरोजगारीचे वाढते प्रमाण यामुळे सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखीचे विषय आहेत. राष्ट्रवादीचे अशोक पवार यांनीही कारखाना कार्यक्षेत्राच्या माध्यमातून या भागात पकड मजूबत केली आहे़. एकूणच दोन्ही उमेदवार एकमेकांच्या तोडीस तोड असून, काँटे की टक्कर होणार, हे नक्की़. पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाºया शिरूर-हवेलीमध्ये भाजपकडून विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे, तर राष्ट्रवादीकडून अशोक पवार मैदानात उतरले आहेत़ या मतदारसंघात काही प्रश्नांवरच संपूर्ण निवडणूक अवलंबून आहे़. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचे आश्वासन, पाच वर्षांपूर्वी दिलेले वचन आजपर्यंत ते पूर्ण झाले नाही; तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचेही पुणे बाजार समितीत विलीनीकरण झाले़. त्या वेळी विद्यमान आमदारांनी भूमिका बजावणे आवश्यक होते; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा शिरूरदौरा यामुळे भाजपचे निष्ठावंत त्यांच्याच पाठीशी असल्याचे चित्र स्पष्ट झाले़. त्याचबरोबर घोडगंगा साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र याच मतदारसंघात असल्यामुळे साहजिक मतदारांपर्यंत त्यांना पोहोचणे काही कठीण काम नाही़. अजित पवार यांचे एक अत्यंत निष्ठावान आणि जवळचे मानले जाणारे अशोक पवार यांनी त्यांच्या २००९ च्या कार्यकाळामध्ये प्रशासकीय इमारत, ग्रामीण रुग्णालये यांसह अन्य विकासकामे केली़. ...........प्रदीप कंद यांचा परिणाम होणार का?राष्ट्रवादीचे प्रदीप कंद यांनी आमदारकीसाठीही प्रयत्न केले़ त्यात अपयश मिळाल्याने त्यांनी भाजपची वाट धरली; पण त्याचे मतांत रूपांतर होईल हे सांगणे कठीणच आहे़ स्वत: उभे राहणे आणि दुसऱ्यासाठी मते मागणे यात फरक असतो़. राष्ट्रवादीचेही या भागात वर्चस्व आहे़, ही गोष्टही दुर्लक्षित करून चालणार नाही.