पिंपरी : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे न बोलवताच ईडीच्या कार्यालयात गेले. बोलवल्यानंतर जावेच लागेल. बँक घोटाळा व सिंचनातील सत्तर हजार कोटी कुठे गेले, याची चौकशी व्हायला नको, असा सवाल उपस्थित करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंपरीतील सभेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांच्यावर टीका केली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील मैदानावर शिवसेनची सभा शुक्रवारी सायंकाळी झाली. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा सदस्य अमर साबळे, महापौर राहुल जाधव, भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार, उपनेत्या डॉ. नीलम गोºहे, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात आम्ही ठरवलय युतीचेच सरकार येणार आहे. गोरगरिबांच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी युती केली आहे. लोकसभेला विरोधी पक्ष थोडा तरी शिल्लक होता. आता विधानसभेच्या निवडणुकीत तोही शिल्लक नाही. काही ठिकाणी उमेदवारही दिले नाहीत. त्यांच्याकडून नाराज होऊन नेते बाहेर पडताहेत. उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावरून विरोधीपक्षाची अवस्था लक्षात येईल. युती सरकार आम्हाला लक्ष्य करीत आहेत, ही पवारांची टीका चुकीची आहे. ’’
त्यांनीही सत्तेचा दुरुपयोग केला नाही का?शेतकरी कर्जमाफी ऐवजी कर्जमुक्ती देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. सत्तेचा आणि यंत्रणेचा गैरवापर केला जातोय, असा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे. त्यांनीही सत्तेचा दुरूपयोग केला नाही का? असा सवाल ठाकरे यांनी केला......‘‘भाजप-शिवसेना युती मनापासून केली आहे. बंडखोरांची गय करणार नाही. वचननामा स्वप्न पूर्ण, ३७० कलम वचन पूर्ण झाले. उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही एक झालो आहोत. राष्ट्रवादीची काळी कृत्ये उजेडात आली आहेत.’’ असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजगुरुनगर येथे सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ केले.