पुणे : चंद्रकांत पाटील हे मुळचे काेल्हापूरचे आहेत. ते राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री हाेते. त्यांना काेल्हापूरमधून उभं राहायला भीती का वाटली , असा प्रश्न करत तुम्हाला स्थानिक उमेदवार हवाय की बाहेरचा असा सवाल राज ठाकरे यांनी मतदारांना केला.
काेथरुडमध्ये राज ठाकरे यांच्या सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. ठाकरे म्हणाले, शेवटच्या टप्प्यात काेथरुडची सभा ठेवली. संपूर्ण निवडणुकीत काेथरुडच्या निवडणुकीत रंगत आहे. भाजपाकडून बाहेरचा उमेदवार नागरिकांवर लादला जाताे, त्याचे एकमेव कारण म्हणजे सत्ताधारी तुम्हाला गृहीत धरतात. आम्ही काेठूनही कुठलाही उमेदवार दिला तरी त्याला भाबडी जनता निवडून देईल असे ते गृहीत धरतात. सत्ता डाेक्यात गेल्यावर अशा गाेष्टी हाेतात.
काेणत्या मतदार संघामध्ये कुठल्या समाजाची लाेक राहतात याप्रमाणे उमेदवार सध्या दिले जातात. असे वातावरण 10-15 वर्षापूर्वी राज्यात नव्हते. राज्याला काय झालंय कळत नाही, महाराष्ट्राने देशाचं नेतृत्व केलं ताे जाती पातींमध्ये सडताेय. महाराष्ट्राचा बिहार कारायचाय का ? असा संतप्त सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
राम गणेश गडकरींचा पुतळा पाडला. पुतळा पाडणाऱ्यांना राम गणेश गडकरी काेण हे माहित आहे का? त्यांना वाटलं असणार नितीन गडकरींचे नातेवाईक असणार पाडा पुतळा. आम्ही महापुरुष, कलाकार यांना जातीत वाटू लागलाे आहाेत. महापुरुषांना आपण जातीत पाहणार आहाेत का ? मतदारसंघामध्ये एकच निकष हवा, असलेला उमेदवार काम करणार की नाही. काेथरुडमधली निवडणूक तर अत्यंत साेपी आहे. इथला आमदार स्थानिक हवाय की बाहेरचा एवढाच निर्णय काेथरुडकरांनी करायचा आहे. पाटील निवडणुकीनंतर हाताला लागणार आहेत का. परंतु अशा गाेष्टी घडतात कारण तुम्हाला गृहीत धरलं जातं. असेही ठाकरे यावेळी म्हणाले.